पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावबंदीचा कार्यक्रम सुरू करण्यात येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना आपल्याला गावात राहून किंवा सवडीनुसार शेजारच्या गावातील भावाबहिणींच्या मदतीला जाऊन जेव्हा केव्हा सरकारपक्षाच्या आमदारनामदारांचा कार्यक्रम ठरेल तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या या 'तुघलकी' मनसुब्याला विरोध करता येईल. हा 'गावबंदी'चा कार्यक्रम १० नोव्हेंबर २००० पर्यंत म्हणजे सांगली-मिरजचे अधिवेशन सुरू होईपर्यंत चालू राहील. या अधिवेशनात, आवश्यक वाटल्यास आंदोलनाचे पुढील टप्प्यातील स्वरूप ठरविता येईल.
 आठव्या अधिवेशनाची विषयपत्रिका
 शेतकरी संघटनेचे सांगली-मिरज येथे भरणारे अधिवेशन आठवे अधिवेशन असेल. 'आठवे' या शब्दाशी अनेक कथा जुळलेल्या आहेत. देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण हा युगंधर ठरला. हे आठवे अधिवेशनही युग बदलणारे ठरणार आहे. विषयपत्रिकेवर चर्चा करण्याआधी या अधिवेशनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊ.
 इंग्रजांनी देश लुटला, इंग्रज देश सोडून निघून गेले, गोऱ्या इंग्रजाची जागा काळ्या इंग्रजाने घेतली पण शेतकऱ्याचं शोषण गेली पन्नास वर्षे चालूच राहिले; शेतकरी कर्जबाजारी झाला, निरक्षर राहिला, त्याच्या आरोग्याची हेळसांड झाली, जमिनीची उत्पादकता गेली, कामाची जनावरे कमी झाली. जी काही यंत्रसामग्री होती तीही संपत गेली, भांडवल संपत आले. अशा तऱ्हेने एखाद्या शत्रूने देश लुटावा तसं 'इंडिया' आणि 'भारत' यांच्या या संघर्षात इंडियावाल्यांनी भारताला लुटून खाल्लं. इतकं की, शेतकऱ्याला जगणं अशक्य झालं. विष पिऊन आत्महत्या करणे बरे पण आपल्या घराण्याची बदनामी झालेली पाहायला लागू नये. अशा तऱ्हेची भावना एका वर्षी दीड हजारांवर शेतकऱ्यांच्या मनात तयार झाली. यापेक्षा त्याला वेगळा पुरावा असण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या महायुद्धात पाडाव झालेल्या जर्मनीची जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती एका अर्थाने आपल्या 'भारता'ची झाली; या लढाईत 'इंडिया' विरुद्ध आपण टिकू शकलो नाही, अनेक कारणांनी आपण हरलो आणि समस्त 'भारता'ची धूळधाण झाली. हा झाला एक मुद्दा.
 'भारता'ची 'इंडिया'बरोबरच्या युद्धात जी धूळधाण झाली ती समाजवादाच्या नावाखाली झाली. या समाजवादाविरुद्ध शेतकरी संघटनेने पहिल्यांदा आवाज उठवला. आज, समाजवाद ही विषाची कुपी आहे हे जगमान्य झाले आहे; समाजवादाची कास धरलेला कोणताही समाज टिकू शकत नाही हे रशियाच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५२