पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तोडून टाळून तुंबलेला हा प्रवाह वाहता करणे हे शेतकरी संघटनेचे काम आहे. शेतकरी संघटनेचे काम करताना जेव्हा जेव्हा मनावर मळभ येईल की आता कसं करावे, आपल्या हाती काहीच साधनं नाही, सामनेवाल्यांकडे पैसा आहे, सत्ता आहे, वर्तमानपत्रांसारखी साधनं आहेत; आपल्याकडे काहीच नाही, आपण लढावं कसं आणि किती? तेव्हा कार्यकर्त्यांनी आपल्या मनाला खात्री द्यावी की आपल्याजवळ काही नसलं तरी आपल्यामागे इतिहास उभा आहे आणि ज्याप्रमाणे महाभारतात श्रीकृष्ण मागे असताना विजय जितका अटळ होता तितकाच आपला विजय अटळ आहे. आपली ही जी ताकद आहे तिची प्रचीती घेण्याकरिता कार्यकर्त्यांनी सांगली, मिरजेच्या येत्या अधिवेशात आपापल्या जिल्ह्याचे दालन उभे करून त्यात शेतकरी आंदोलनातील आपल्या सहभागाचे, कामगिरीचे प्रदर्शन करावे. शेतकरी संघटनेकडे काहीच नाही, जे काय आहे ते इतर पक्षांकडेच आहे. अशी जी काही भावना लोकांच्या मनात तयार होऊ लागली आहे ती या वैभवाच्या दर्शनाने निश्चितपणे दूर होईल. शेवटी, आपली आई फाटकं लुगडं नेसत असली तर 'ही काही आपली आई नाही, जरीचं लुगडं नेसलेली दुसरी कुणीतरी आपली आई आहे' असं कुणी म्हणत नाही, तसंच आपलीही काही वैभवशाली परंपरा आहे हे अशा प्रदर्शनाने स्पष्ट होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनातील न्यूनतेची भावना नष्ट होईल.
  'भूजल विधेयक' विरोधी आंदोलन
 ९ ऑगस्ट २००० रोजी महाराष्ट्रभर महाराष्ट्र सरकारच्या भूजल विधेयकाविरुद्ध आंदोलनाची सुरुवात म्हणून राज्याच्या सत्तारूढ पक्षांच्या आमदारांच्या घरांना घेराव घालण्याचा यशस्वी कार्यक्रम झाला. त्याने शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाविषयी कोल्हेकुई करणारांची तोंडे बंद झाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या विधेयकाविरुद्ध आपले जाहीर मतप्रदर्शन केल्यानंतर आणि सरकारपक्षाच्या बऱ्याच आमदारांनी आंदोलकांना सामोरे जाऊन शेतकऱ्यांची या विधेयकाबाबतीची भूमिका रास्त असल्याचे मान्य केल्यानंतरसुद्धा महाराष्ट्र सरकार त्यावर फेरविचार करण्याऐवजी हे 'तुघलकी' विधेयक विधानसभेत आणण्याचा हट्ट कायम ठेवून आहे. त्यामुळे हे आंदोलन चालू ठेवणे भाग आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ९ ऑगस्टचाच कार्यक्रम चालू ठेवण्याने त्यात काही उत्साह राहणार नाही; त्याशिवाय, सगळ्या लोकांनी आमदारांच्या पदाधिकाऱ्यांच्या गावी जाऊन आंदोलन करणे म्हणजे मगरीने पाण्याबाहेर येऊन लढाई करण्यासारखे होईल, त्याऐवजी, आपले जुने शस्त्र बाहेर काढून २ ऑक्टोबर २००० पासून सरकारपक्षाच्या आमदारांना

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५१