पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळेल तिथे ते पैसा गोळा करीत आहे. सरकार आणि उत्पादक व शेतकरी यांच्यात संघर्ष तयार झाला आहे.
 माईक मूर म्हटल्याप्रमाणे हे नवरा-बायकोचे भांडण असले तरी हे नवराबायकोचे साधे भांडण नाही; हे दारूडा नवरा आणि त्याची बायको यांच्यातील वादासारखे भांडण आहे. सरकारला आता दारूड्या नवऱ्याचीच उपमा चपखल बसते. घरी असतील ते स्वतः कमवलेले पैसे उचलून घेऊन जायचे आणि दारू प्यायची, बायकोने मोलमजुरी करून कमावलेले पैसेही काढून घ्यायचे आणि दारू प्यायची, पोरांनी खाऊकरिता साठवून ठेवलेले पैसेही ओरबाडून घ्यायचे आणि दारू प्यायची आणि अख्ख्या घराची नासाडी करायची. याप्रकारे वागणाऱ्या नवऱ्यासारखेच सरकारचे काम चालू आहे. एखाद्या बायकोने समजुतीने नवऱ्याला रोज पाचदहा रुपये दारू पिण्यासाठी दिले आणि त्याच्याशी गोड वागून, बोलून किंवा नवससायास करून त्याची दारू सुटावी म्हणून प्रयत्न केले आणि त्याची दारू सुटली असे उदाहरण कधी सापडणार नाही. तसेच, या सरकारकडूनही आता उधळपट्टीचे व्यसन सुटेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तेव्हा तुम्ही आता पाणीपट्टी म्हणा, वीजबिल म्हणा, कर्जफेड म्हणा - ज्या ज्या मार्गाने सरकारला द्याल त्या सर्व पैशांची सरकार उधळपट्टीच करणार आहे; त्या पैशांनी हा दारूडा नवरा फक्त दारूच पिणार आहे. दारूड्या नवऱ्याला एक पैसासुद्धा देणे म्हणजे घराच्या सत्यानाशाला आमंत्रण आहे. म्हणून, आपले आंदोलन यापुढे सोपे आहे. दारूड्या नवऱ्याला पैसा देण्याचे पाप करायचे नाही.
 तेव्हा, शेतकरी संघटनेचा आजपासून आंदोलनाचा कार्यक्रम ठरला आहे. यापुढे पाणीपट्टी असो, वीजबिल असो, कर्जफेड असो की आणखी कोणतेही सरकारी देणे असो - ते सरकारला भरणा करण्यास ठाम नकार देणे; त्यासाठी मग तुरुंगात जावे लागले तरी चालेल.
 हलाखीचीही आपत्ती राष्ट्रीय आहे, केवळ महाराष्ट्रामध्ये होणार नाही. ते पायरी-पायरीने देशव्यापी होणार आहे. आज ७ फेब्रुवारीपासून आपण महाराष्ट्रात ते सुरू केले आहे. आजपासून ४० दिवस हा लढा आपल्याला एकट्याने आपण महाराष्ट्रात चालवायचा आहे. १७ मार्च २००० रोजी शेतकऱ्यांचे अखिल भारतीय संमेलन किसान समन्वय समितीच्या झेंड्याखाली आंध्र प्रदेशातील तिरूपती येथे होणार आहे. त्या मेळाव्यात 'दारूड्या नवऱ्याला एक पैसाही न देण्याचा' कार्यक्रम अखिल भारतीय पातळीवर जाहीर केला जाईल. १७ मार्चपासून देशभर हे आंदोलन सुरू झाले की त्यानंतर १ महिन्याने म्हणजे १७ एप्रिल २००० रोजी दिल्लीच्या विज्ञानभवनामध्ये जागतिक शेतकरी मंचाच्या भारतीय शाखेच्या परिषदेचे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४८