पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थोडी थोडी शेती विकत घर चालवतो तसेच हिंदुस्थान सरकार नादार बनल्यासारखे एक एक कारखाना, उद्योग विकून आपले प्रशासन चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे; आपली नोकरशाही बळकट ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
 महाराष्ट्रात पाणीपट्टी एकरी २२५ रुपयांवरून ९१८ रुपयांपर्यंत वाढवली. परवानगी न घेता पाणी घेतले तर आता दंडाची रक्कम १० रुपये प्रति गुंठाऐवजी ५७ रुपये होणार. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात पाणी घेतले नाही तरी नदीच्या किंवा पाटाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना पाझर फुटतात म्हणून त्यांच्याकडून पाझरकरही वसूल करणार! विजेचा दर प्रतिहॉर्सपॉवर ३०० रुपये होता तो आधी ५०० झाला, ५०० चा ७००, आता ७०० चा ९०० झाला.
 हे कशासाठी चालले आहे? याचा अर्थ सरळ आहे. नदीच्या किंवा पाटाच्या पाण्यामुळे विहिरींना पाझर फुटतो म्हणून पाझरकर लावला तर लोक मुकाट्याने मान्य करतील असे समजण्याइतके सरकार काही मूर्ख नाही. पण ही पाझरकराची कल्पना या आधीही स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना खाली खेचून स्वतः त्या जागी बसण्यासाठी महाराष्ट्रात वापरली गेली आहे.
 शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी या मेळाव्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही दिले होते. त्यांचा उद्देश स्पष्ट होता की शेतकरी आपल्या समस्यांविषयी काय बोलतो हे त्यांनी स्वतःच्या कानांनी ऐकावे आणि त्यावर आपली भूमिका मांडावी; पत्रापत्रीची भानगड नको. पण त्यांनी काही कारणे सांगून निमंत्रण नाकारले; पण ते आले नाहीत म्हणजे शेतकरी इथे कशासाठी जमले आहेत, आंदोलने कशासाठी करीत आहेत वगैरे त्यांना कळणार नाही असे समजण्याचे कारण नाही. दुसऱ्या पक्षाच्या किंवा गटाच्या एखाद्या माणसाने एखाद्या मंत्र्याची भेट घेतली तर तो त्याला विकत घ्यायला आला होता का, असल्यास त्याच्या सूटकेसमध्ये किती रकमेच्या नोटा होत्या याची बित्तबातमी मिळू शकेल अशी यंत्रणा ज्यांच्याजवळ असू शकते त्यांना शेतकरी आंदोलन कशासाठी करीत आहेत हे कळत नाही असे समजायचे काही कारण नाही.
 तेव्हा, पाणीपट्टी वाढली आहे, विजेचे दर वाढले आहे, कापसाच्या खरेदीनंतर दिलेले चेक वटत नाहीत या सगळ्यांमागे एकच कारण आहे, की सरकार नादार बनले आहे. दिवाळखोर बनले आहे; देशामध्ये आर्थिक अराजक माजलेले आहे आणि केंद्रीय तसेच राज्य सरकारातून आदेशांवर आदेश सुटतात की काय वाटेल ते करा पण कर वाढवा, वसुली वाढवा आणि या वसुलीच्या वेगवेगळ्या भागातील बातम्या आपल्यासमोर येत आहेत त्यावरून सिद्ध होते की हे सरकार आता लुटारूंचे, ठगांचे, पिंढाऱ्यांचे आणि खिसेकापूंचे झाले आहे आणि जिथे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४७