पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जोतिबा फुले घोंगडे खांद्यावर टाकून गेले त्या व्हॉईसरॉयचे नाव माहिती नाही, जोतिबा फुल्यांचेच नाव माहिती आहे. इतिहास घटनेचे यथार्थ मूल्यांकन करतो हा विश्वास ठेवा.
 माझी चळवळ शेतकऱ्याची आहे का? आहे. पण मी काही शेतकरी नाही. शेतकरी नसूनही मी शेतकऱ्याकरिता सगळा संसार का उधळून टाकला? कारण, मी जो लढा देतो आहे तो स्वातंत्र्याचा लढा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मी हा लढा सुरू केला तेव्हा, या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा येतो तो शेतकऱ्यांच्याबाबतीत अशी खात्री पटल्यामुळे मी शेतकरी संघटनेला सुरुवात केली.
 इतिहास पडताळून पाहिला तर असे दिसते की इतिहास हा जास्तीत जास्त स्वातंत्र्याकडे जातो. इतिहासाच्या सुरुवातीला अनेक भिंती होत्या. भाषेच्या भिंती होत्या. जातीच्या भिंती होत्या, धर्माच्या भिंती होत्या, भूगोलाच्या भिंती होत्या आणि गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासात काय घडले ते एका वाक्यात सांगायचे तर या सगळ्या कृत्रिम भिंती, महापुरामध्ये भिंती तडातडा फुटून वाहून जाव्यात, तशा फुटत आल्या आहेत. इतिहासामध्ये विजय प्रत्येकवेळी स्वातंत्र्याचा झाला आणि ज्यांनी ज्यांनी धर्माच्या नावाखाली, अर्थकारणाच्या नावाखाली स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न केला, "सामान्य माणसाला समजत नाही, मी सांगतो तुमचं कशानं कल्याण होणार आहे ते." असं ज्यांनी ज्यांनी म्हटले त्यांना त्यांना इतिहासाने धुळीस लोळवले आहे. स्वातंत्र्य हा इतिहासाचा संदेश आहे आणि अलीकडच्या इतिहासामध्ये शेतकरी संघटना ही हिंदुस्थाना मध्येतरी स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन पुढे जाणारी सर्वांत मोठी संघटना आहे. इतिहास तुमचा आहे, भविष्य तुमचे आहे.
 मग, सध्याची जी परिस्थिती आहे तिची कशाशी तुलना करता येईल. या परिस्थितीची तुलना 'शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतरच्या परिस्थितीशीच करता येईल. मी शिवाजी महाराज नाही होऊ शकणार, पण शेतकरी संघटनेचे काम हे शिवाजी महाराजांच्या कामाच्या तुलनेचे आहे. शहाजी राजांनी, मालोजी राजांनी बादशाहीपासून स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न देशमुखांना एकत्र करून केला; शिवाजी महाराजांनी मावळे एकत्र केले. शेतकरी संघटनेने आपले काम चालू असताना साखर कारखान्याचे संचालक, अध्यक्ष गोळा केले नाहीत तर तळागाळातील, शेतीमध्ये घाम गाळणारा शेतकरी उभा केला. म्हणून मी म्हणतो की शेतकरी संघटना कामाच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या तुलनेची आहे. आता आग्र्याहून सुटली आहे आणि राज्यभिषेक

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४०