पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जो व्हायचा आहे तो काही फार दूर नाही; शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेनंतर पाचसहा वर्षांतच राज्यभिषेकाचा शुभदिवस आला.शेतकरी संघटनेचाही तो दिवस येणारा याची खात्री बाळगा.
 माझ्या हातून चुका झाल्या असतील. कित्येक कार्यकर्त्यांच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या असतील, कारसेवा आंदोलनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही अप्रिय घटना घडल्या असे मी ऐकतो आहे. मला मुलगा नाही पण अनेक कार्यकर्त्यांना मी मुलासारखं मानलं, त्यांनीसुद्धा बाप जरा दुबळा झाल्यासारखा वाटल्यानंतर घरातली मुलं जशी गडबड करतात, तशी गडबड केलेली पाहिली. मनाला क्लेश झाले; पण हे सगळं झालं तरी आपली सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आपण सत्य मार्गाचे यात्रिक आहोत, महात्मा जोतिबा फुल्यांनी दिलेल्या मार्गाने चालतो आहोत. आपला विजय निश्चित आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वजण काम करीत राहिलो तर सध्याचा अंध:कार दूर व्हायला पाचसहा वर्षांपेक्षा काही जास्त काळ लागणार नाही असा मला विश्वास आहे.
 जागतिक शेतकरी मंचावर माझी नेमणूक झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. या मंचाची हिंदुस्थानातील पहिली परिषद दिल्ली येथे १०, ११, १२ एप्रिल २००० रोजी होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन हिंदुस्थानचे राष्ट्रपती करणार असून, त्यात अत्यंत महत्त्वाचे भाषण स्वतः पंतप्रधान करणार आहे. वित्तमंत्री परिषदेला सर्वकाळ हजर राहणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येण्याचे निमंत्रण आहे. यावेळी आगगाडीने फुकट प्रवास करण्याची गरज नाही; कारण या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांना रेल्वेच्या प्रवासाचे तिकीट दिले जाणार आहे.
 खुल्या व्यवस्थेमध्ये सरकार अन्याय करू लागले तर त्याला विरोध करण्याचा मार्ग रास्ता रोको नाही ते समाजवादाच्या काळातले हत्यार होते. आता हत्यारे वेगळी आहेत, व्यापारी हत्यारे आहेत. आवश्यक तर कांद्याचा भाव ६० रुपये किलो करून दाखविण्याची हत्यारे हाती घ्यायची आहेत. त्याकरिता वेगळ्या बांधणीला सुरुवात झालेली आहे. तुम्ही, मनामध्ये जी काही निराशा आली असेल, अंध:कार दाटला असेल तो दूर करून शेतकरी संघटनेवरील श्रद्धा कायम ठेवावी.

(१२ जानेवारी २०००, जिल्हा कार्यकारणी बैठक श्रीरामपूर.)
(शेतकरी संघटक २१ जानेवारी २०००)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४१