पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रामचंद्र! आणि म्हणून लोक त्यांच्याबाजूने वळले. शिवसैनिक दंगे करतात म्हणून नव्हे. आमच्याजवळ वर्तमानकाळात अभिमान बाळगण्यासारखे काहीच उरले नव्हते - या कारणाने जातीयवाद्यांचे राज्य आले.
 मी तुम्हाला गुंडगिरी करायला सांगत नाही; पण माझी परवानगी नसल्यामुळे तुम्ही गुंडगिरी केली नाही हे भेकडाचे तत्त्वज्ञान मला सांगू नका. शेतकऱ्याचा सन्मान राखण्यासाठी जिथे आवश्यक तिथे स्थानिक पातळीवर दहा माणसे जरी जमा झाली तरी चालेल; काय जमेल ते करून दाखवा. जमले तर कोर्टात जाऊन, जमले तर जिल्हा कचेरीत जाऊन, जमले तर मंत्र्याकडे जाऊन आणि जमले तर तुम्हाला जे 'हत्यार' योग्य वाटेल ते वापरून अशी प्रतिमा तयार करा की भारतातला शेतकरी हा नागासारखा आहे; त्याच्या वाटेला कुणी गेले तर फुस्स करून फडा काढतो. एवढी भीती जरी तुम्ही लोकांच्या मनात तयार केली, मग त्यासाठी तुम्ही कोणतीही साधनं वापरा, मी तुमच्यामागे उभा राहीन.
 आजारपणात, माझ्या मनात निराशेचा विचार येत असे. आपण लोकांना पुढे केले, आपल्या शब्दासाठी किती लोकांनी काय काय सोसले, आपल्या खिशातले पैसे काढून संघटनेचे कार्यक्रम केले, घरामध्ये अशांती आणली, सतत घराबाहेर राहिल्याने घरची लक्ष्मी नाराज झाली. एवढे करूनही शरद जोशीपुढे जायला मिळाले नाही, आपले नाव त्यांच्या कानी पडले नाही म्हणून निरुत्साही न होता कामे करीत राहिले. माझ्या मनात प्रश्न येत असे आपण यांचे उतराई कसे होणार आहोत? मग मीच माझी मला उत्तरे दिली.
 पहिले उत्तर - शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आजवर जो त्याग केला, जी किंमत मोजली त्याची अपेक्षा करण्याचा मला अधिकार होता, कारण इतर कोणाही इतकीच माझा प्रपंच उधळून देण्याची तयारी मीही दाखविली आणि जिथे जिथे आवश्यक होते तिथे तिथे माझा जीव धोक्यात घातला; शेतकऱ्याचा मुलगा नसताना घातला, ब्राह्मण असून घातला.
 दुसरे उत्तर - मी तर बाहेरचा, उपरा; मी काही शेतकऱ्याघरचा नाही; पण महात्मा जोतिबा फुले हे तर शेतकऱ्याघरचे? त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडले ते पाहिले तर हिंदुस्थानातल्या लोकांनी माझ्यापेक्षा त्यांची फारच वाईट अवस्था केली हे लक्षात येईल. म्युनिसिपालिटीच्या एका निवडणुकीत त्यांच्या वॉर्डात त्यांना फक्त दोन मते मिळाली, दुसऱ्या वॉर्डात एकही नाही. त्यांच्या पत्नीवर चिखलफेक झाली. त्यांची चळवळ तीन जिल्ह्यांच्यावर पसरू शकली नाही. जोतिबांच्या आयुष्यामध्ये त्यांना मान मिळाला नसेल, त्यांची हेटाळणी झाली असेल, इतिहास त्याची भरपाई करतो. व्हॉईसरॉयच्या दरबारामध्ये खांद्यावर घोंगडे टाकून ते गेले होते. आज कोणालाही कोणत्या व्हॉईसरॉयच्या दरबारात

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३९