पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी विदर्भातील कापूस उत्पादकांच्या चाळीसपट जास्त कापूस एकरी घेतात.
 हे नवीन तंत्रज्ञान हाती कसे घ्यायचे? त्याकरिता नवे मार्ग काय? यासंबंधी आपल्याला फार तपशीलवार ऊहापोह करावा लागेल.
 गेल्या महिन्यात मी लासलगावला गेलो होतो. कांद्यांचे भाव पार पडले होते. लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जवळजवळ सर्व पदाधिकारी हे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते आहेत. ते मला सांगू लागले. आम्ही पंतप्रधान वाजपेयी यांना भेटायला गेलो तर ते आम्हाला विनम्रपणे नमस्कार करून म्हणाले, "तुम्ही कांदाउत्पादक शेतकरी का? तुम्ही फारच जबरदस्त आहात. तुमच्यामुळं आम्ही दोन राज्यांतील निवडणुका हरलो आणि आता ग्राहकांचा विचार करा; केवळ शेतकऱ्यांचा करू नका," असा त्यांनी आम्हाला सल्ला दिला.
 लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकर्त्या संचालकांना मी म्हटलो, "एक काळ असा होता की तुम्ही जर रस्त्यावर बसलात, रेल रोको केलं तर सरकारचं लक्ष जात होतं. आता सरकार मोठं निगरगट्ट बनलं आहे. काश्मिरात जे चाललं आहे, आसामात जे चाललं आहे, अयोध्येला जे चाललं आहे ते पाहता हजार दहा हजार शेतकरी रस्त्यावर बसले आणि अटकेत गेले तर सरकारच्या वागण्यात काही फरक पडणार नाही."
 गुजराततध्ये नर्मदा धरण कारसेवेसाठी इतकी मंडळी जमली होती पण गुजरात सरकारने त्या सगळ्यांना गावागावात अडकून ठेवले आणि वर्तमानपत्रांना आंदोलनाचा फज्जा उडाला अशा बातम्या द्यायला लावल्या.
 आता यापुढे, सरकारला जी भाषा समजते तीच भाषा वापरावी लागेल. कांद्याचा भाव ६० रुपये किलो झाला तर सरकार घाबरत असेल तर आता रस्त्यावर जाण्यापेक्षा कांदा ६० रुपये किलो कसा करता येईल याची व्यवस्था आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागेल. म्हणजे मगच राजकारणासाठी लागणारी भाषा आपण बोलू शकू.
 अशा तऱ्हेची साधने, अशा तऱ्हेचे मार्ग. सत्याग्रहाच्या पद्धती आपल्याला शोधून काढाव्या लागतील. पण याचा अर्थ कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलने करायचीच नाहीत असा नाही.
 वाईट वाटणाऱ्या गोष्टी ऐकल्या, तशा चांगले वाटणाऱ्या गोष्टी मागील वर्षात घडल्या आहेत. लसलगावला कांद्याची कोंडी होताच शेतकऱ्यांनी आपणहून आंदोलन चालू केले. कोल्हापूर, सांगली भागात शामराव देसाईच्या नेतृत्त्वाखाली आजही साखर कारखानदारांच्या मोटारगाड्यांना काळे फासायचे आंदोलन चालू

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३७