पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घातले नाही.
 आजच्या परिस्थितीमध्ये काय होते आहे? ५ जानेवारीला दिल्लीला वित्तमंत्र्यासमोर झालेल्या अंदाजपत्रकपूर्व चर्चेमध्ये मी एक मुद्दा मांडला. हिंदुस्थानात १९६५ मध्ये हरित क्रांती झाली. वरखते आणि औषधे वापरली म्हणजे पिके वाढतात हे काही नवीन ज्ञान नव्हते; पण पंडित, नेहरूंपासून देशातील सगळेच नेते म्हणत की, "अशा प्रकारची सुधारित शेती नको. सुधारित शेतीचे काय भयानक परिणाम होतील हे सांगता येत नाही. गावातील श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी यांच्यातील दरी वाढेल." अखेरी, एक लालबहादुर शास्त्री निघाले, एक सी. सुब्रह्मण्यम् निघाले आणि एक अण्णासहेब शिंदे निघाले की ज्यांनी हरित क्रांती प्रत्यक्षात इथे जमिनीवर आणून दाखवली.
 आणि आजसुद्धा नेमके असे घडते आहे की, शेतीमधील एका नव्या क्रांतीला सुरुवात होते आहे. हरित क्रांतीला इंग्रजीत ग्रीन रिव्होल्यूशन (Green Revolution) म्हणतात. या नव्या क्रांतीला मी जीन रिव्होल्यूशन (Gene Revolution) म्हणेन. आता शेतीतील उत्पादकता वाढणार आहे ती बियाण्यांच्या स्वरूपातच बदल करून, बीजाचं अंतरंगच बदलून; पण ६५ सालच्या हरित क्रांतीच्या आगमनाबाबत आपण जितके बेसावध होतो तितकेच आज या नवीन क्रांतीबाबात बेसावध आहोत. हा बेसावधपणा दूर करून जगाशी टक्कर देण्याच्या तयारीने आपण उभे राहिलो तर भारतीय शेतीला भवितव्य आहे.
 पहिल्यांदा असे घडले आहे की, हिंदुस्थानातील कापसाची किंमत जागतिक बाजारपेठेतील किंमतीपेक्षा जास्त आहे. हे पहिले वर्ष असे आहे, की गव्हाची जागतिक बाजारपेठेतील किंमत हिंदुस्थानातील गव्हाच्या किमतीपेक्षा कमी आहे. कांद्याला निर्यातीचा परवाना मिळाला असला तरी हातात बाजारपेठ नाही; कारण कांद्याची बाहेरची किंमत आपल्या कांद्यापेक्षा कमी झाली आहे. बाहेरच्या देशांनी तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती केली आहे त्या प्रगतीकडे जाण्याची शक्यता हिंदुस्थानातील शेतकऱ्याला मिळणे आवश्यक आहे. हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी बाजारपेठेत पाहिजे तिथे जाता आले पाहिजे; पाहिजे तिथे खते. औषधे निविष्टांची खरेदी करता आली पाहिजे हे आपण मांडले; पण यापुढे जागतिक तंत्रज्ञान जिथे असेल तिथून आणून त्याचा प्रयोग करण्याचा अधिकार हा भारतातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. बोंडअळीला प्रतिकार करण्याचा अंगभूत गुणधर्म असलेल्या कपाशीच्या बियाण्याचे चाचणीप्रयोगसुद्धा करण्याची परवानगी हिंदुस्थान शासन शेतकऱ्यांना देत नाही. आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहिल्याने आपण दर एकरी उत्पादनात इतर देशांच्या तुलनेने खूपच मागे पडतो. उदाहरणार्थ, बहुतेक देशांतील कापूसउत्पादक

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३६