पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. तेव्हा कोणीही, शरद जोशीची परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही आंदोलन केले नाही असली सबब सांगायचे कारण नाही. ज्याच्यात हिम्मत नाही तोच परवानगीची सबब सांगतो. माधवराव मोरे विचारायचे, "आपली आई आजारी पडली तर तिच्या उपचारासाठी आपण काही ग्रामपंचायतीचा ठराव घेत नाही! तिच्याकरिता औषध आणायला धावतोच ना?" तसे, जिथे जिथे अन्याय वाटेल तिथे तिथे तुम्ही आंदोलन करायला उभे राहा, त्यात तुमच्या हातून चुका झाल्यातरी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन.
 मी गांधीवादी आहे का नाही? असाही एक प्रश्न उभा केला जातो. गांधीचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे, हे खरं आहे. पण गांधीचे अहिंसा तत्त्व आचरायला माहात्म्य लागते. आपण महात्मे नाही, उगीच भलत्या माणसाशी तुलना करू नये; पण "शरद जोशींची परवानगी नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलो, नाहीतर काय उत्पात घडवले असते!" ही भाषा काही खरी नाही.
 समाजवादाचा पाडाव होणार असे आपण वीस वर्षांपूर्वी ठासून सांगितले पण तसा पाडाव झाला तेव्हा माझे किंवा तुमचे नाव कोणी घेतले नाही. त्याला तसेच कारण आहे. नागपूरच्या अधिवेशनात शेतकरी संघटनेने आदेश दिला की नेहरू घराण्याने सबंध देशाचा जो अधःपात केला आहे त्याचा निषेध करण्याकरिता, जसे मॉस्कोमध्ये स्टॅलिनचे आणि लेनिनचे पुतळे तेथील जनतेने पाडले, त्याप्रमाणे या घराण्याचे गावोगाव जे पुतळे आहेत ते पाडून टाका. त्यावेळी आपण जर हे पुतळे पाडले असते तर जगभर बातमी झाली असती की हिंदुस्थानातील खुल्या अर्थव्यवस्थेची जननी शेतकरी संघटना आहे. त्यावेळी आपण हिम्मत केली नाही. हा उल्लेख मी कशासाठी करतो आहे? "शिवसेनेचे लोक तोडफोड करतात, गुंडगिरी करतात म्हणून त्यांना सरकार मिळाले आणि आपण गुंडगिरी करीत नाही कारण शरद जोशी आपल्याला परवानगी देत नाही." असे काही कार्यकर्ते म्हणतात. हे घाबरटांचे तत्त्वज्ञान झाले.
 शिवसेनेचे सैनिक दंगा करतात, पण ते दंगा करतात म्हणून त्यांना राज्य मिळाले हे काही खरे नाही. ज्या माणसाला वर्तमानकाळात सांगायला पुरुषार्थ राहत नाही, अभिमान सांगायला राहत नाही तो नेहमी वाडवडिलांच्या कथा सांगतो, आपल्याकडे स्वतःचे काही सांगण्यासारखे नाही तर मी किती मोठ्या कुळातला, माझी जात किती श्रेष्ठ वगैरे गोष्टी तो बोलायला लागतो, तसेच, समाजवादाच्या काळामध्ये हिंदुस्थानचा अधःपात झाला, दक्षिण कोरियासारखे छोटे छोटे देश आपल्यापुढे निघून गेले. स्वाभिमान सांगायला काही उरले नाही. मग, इतिहासातून ज्यांच्याबद्दल अभिमान वाटावा अशा विभूती शोधून काढल्या. महाराष्ट्राच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज आणि देशभराच्या दृष्टीने प्रभू

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३८