पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 म्हणजे काही सगळीच संचालक माणसं खोटी आहेत, भामटी आहेत असं नाही मला म्हणायचं! पण, जे काही काम चाललं आहे त्या पद्धतीने शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळणं शक्य नाही. आज २६० च्या जागी ४६० भाव मिळाला तर त्याचा अर्थ पुढच्या वर्षीच्या भावातून २०० रुपयांची उचल केली आहे. त्यामुळे हा कारखाना आणखी बुडणार आहे.
 हा कारखाना वाचवायचा असेल तर आता एकच मार्ग आहे. जर का या परिसरातीलच असलेले उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी ठरवलं की या साखर कारखान्याला आम्ही दरवर्षी १० कोटी रुपये दान देणार आहोत तरच हा कारखाना वाचू शकतो! अन्यथा नाही.
 पण, अशा तऱ्हेचे दान आणि भीक मागण्याकरिता संघटना तयार झालेली नाही आणि दान घेऊन किंवा भीक घेऊनही हा कारखाना चालू राहिला आणि अशाच तऱ्हेने अकार्यक्षमतेने चालत राहिला तर त्या दानाचं ओझं पुन्हा शेतकऱ्यांच्याच डोक्यावर येणार?
 मग, साखरेचा रोग काय आहे?
 पहिला प्रश्न उभा राहतो की हा साखर कारखाना तयार झालाच का? इथं जर जवळपास ऊस नव्हता किंवा वाहतुकीचा खर्च जास्त येत होता तर हा कारखाना झाला का? महाराष्ट्रात उसाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी रडतो आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार दरवर्षी दिल्लीला जाऊन दहा पंधरा कारखान्यांना लायसेन्स घेऊन येतात आणि दरवर्षी पाच दहा कारखाने नवीन निघतात. हा काय प्रकार आहे? कारखाना कुठे निघतो? कसा निघतो? माझ्या भागातलं उदाहरण मी सांगतो, माझा भाग कोरडवाहू आहे, मी ज्वारी आणि कांदा पिकवतो. कालवा नाही की पाण्याची अन्य सोय नाही. चाकण गावात उन्हाळ्यात पिण्याचं पाणी टँकरने पुरवावं लागतं आणि अजून उसाचं कांडसुद्धा जिथं पिकत नाही त्या आमच्या भागात एक साखर कारखाना मंजूर झाला आहे. कशासाठी? आमच्याकडच्या आमदार-खासदारांचं म्हणणं आहे की, सगळ्या आमदार- खासदारांना काही ना काही मिळालं, कुणाला कॉलेज मिळालं, मला काहीच नाही मिळालं, फक्त दारूचे दोन बार सोडले तर काहीच नाही मिळालं. मग वर असं ठरलं की आपला माणूस आहे, सत्तेतला, पक्षातला; त्याची काही सोय लागली पाहिजे म्हणून सूतगिरणी शक्य नाही म्हणून साखर कारखाना मिळाला. हा कारखाना जर का सत्ताधारी पक्षाच्या विरोधी बाजूच्या माणसानं मागितला असता तर त्याला मान्यता मिळाली नसती. वर्ध्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकदा प्रयत्न केला होता. सर्व तयारी केली, मान्यतेचीही प्रक्रिया पुरी होत आली पण

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२८