पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिसताहेत ते केवळ या परिसरातील शेतकऱ्यांनी लढण्याची तयारी केली आहे आणि त्यांच्या हाकेला ओ देणे हे शेतकरी संघटनेचे काम आहे, म्हणून आणि म्हणून तुम्ही दिलेला हातोडा मी हाती घेतला आहे. आता आपल्याला सगळ्यांना आपल्या हातापायातल्या सगळ्या बेड्या तोडायच्या आहेत.
 साखरेचा प्रश्न काय आहे?
 साखर कारखाना अंबाजोगाईचा आहे, साखर कारखाना सांगलीचा आहे. साखर कारखाने गुजरातमध्ये आहेत, साखर कारखाने पंजाबमध्येही आहेत. तुमचा कारखाना २६० रु. भाव देऊ शकतो. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील एक कारखाना ११०० रु. भाव देत होता. यंदा भाव थोडे पडले तरीदेखील गुजरातमध्ये ७६० रु. कमीत कमी भाव दिला जात आहे. पंजाबमध्ये सहकारी कारखाने आहेत. तिथं नाव 'सहकारी' असल तरी भाव सरकारच ठरवतं आणि तरीसुद्धा पंजाब आणि हरयानामधील सगळ्या कारखान्यांत ८२० रु.चा भाव दिला जातो आणि जिथं देशातील उसाचं ४० टक्के उत्पादन होतं, साखरेचं मोठं उत्पादन होतं त्या या महाराष्ट्रातले कारखाने मात्र कसाबसा ४६० रुपयांचाच भाव देत आहेत. खर म्हटलं तर २६० रुपयेच देताहेत.
 ही काय भानगड आहे?
 एका कारखान्याचा भाव २६० आणि दुसरा ११०० देतो! याची अनेक कारणं आहेत. हा कारखाना तयार झाला आणि या कारखान्याच्या आसपास खूप ऊस पिकत असला तरी उसाची वाहतूक करायचा खर्च वाढतो. ऊस चांगला तयार व्हावा, त्याच बियाणं चांगलं वापरलं जावं, पीक चांगलं यावं, साखरेचा उतारा चांगला यावा यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न या कारखान्यात कमी पडले असतील. मला एकदा एका साखर संचालकांनी सांगितलं की, सहकारी साखर कारखाने तोट्यात जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कारखान्याचे संचालक आणि त्यांची मित्रमंडळी प्रत्यक्षात ऊस कारखान्यात घालतच नाहीत, नुसतंच कागदोपत्री ऊस गेला असं दाखवतात आणि त्यामुळे लाखे रुपयांचं नुकसान होतं. अशा तऱ्हेने भ्रष्टाचार केला तर कारखाना तोट्यात जाऊन उसाचा भाव कमी होऊ शकतो. कुणी म्हणतात रेस्ट हाऊसवर संचालक मंडळाची खूप मजा चालते, कुणी खरेदी-विक्रीवर कमिशन खात म्हणून तोटा होतो म्हणतात.
 भ्रष्टाचाराच्या या आणि अशा सगळ्या कथा खऱ्या असल्या तरी काही कारखान्यांमध्ये आठशे अकराशे भाव मिळतो आणि या कारखान्यांमध्ये दोनशे साठच मिळतो याचा अर्थ हा कारखाना अकार्यक्षमपणे चालला आहे यात काही शंका नाही.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२७