पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऐनवेळी वरून आदेश आला की यातली संघटनेची माणसं काढून टाका आणि त्यांच्या जागी काँग्रेसची माणसं घ्या मग तुम्हाला मान्यता मिळेल. म्हणजे तुम्ही राज्यकर्त्या पक्षातले असला, राज्यकर्त्या पक्षातल्या योग्य त्या बाजूचे असला, तर आणि तुम्ही साखर कारखान्याकरता थोडंफार भांडवल गोळा केलं तर दिल्लीहून त्याला मान्यता येते, तुमच्याकडे उसाचं कांडच काय गवताचं पातं उगवत नसलं तरी चालतं! उलट, जर कुणी सरकारकडे गेलं आणि म्हणालं आम्हाला राजकारणात पडायचं नाही, आमच्याकडे ऊस भरपूर आहे, आम्हाला कारखाना काढायची परवानगी द्या तर तशी परवानगी मिळणे अशक्य.
 महाराष्ट्रात हे जे काही १४० कारखाने काढले ते राजकारण करण्याकरिता काढले गेलेत. त्यांच्यापैकी जास्तीत जास्त पंचवीस ते तीस कारखाने कारखाने म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहेत. बाकीचे सगळे निव्वळ राजकारणाच्या जागा आहेत.
 मान्यता मिळाली की चेअरमन म्हणतो आता मी सगळा परिसर सुधारून टाकतो. प्रत्यक्षात, कारखान्याला परवानगी मिळाली की चेअरमनला काहीसुद्धा काम नसतं. त्यांनी यंत्र कुठून आणायची ते ठरलेलं असतं, कुणाला किती कमिशन द्यायचं, कारखाना कसा बांधायचा ते ठरलेलं असतं. फक्त सरकारकडून आलेले पैसे तिकडच्या तिकडे मार्गी लागले की कारखाना उभा राहतो. कारखान्यात काय काय तयार करायचं, साखरसुद्धा कोणत्या प्रकारची करायची तेही ठरलेलं असतं. कामगार किती लावायचे इथे मात्र चेअमरनच्या बहादुरीला वाव मिळतो. अंबाजोगाईतल्या सर्व कामगार बंधूंना मी सांगू इच्छितो की, "तुम्हाला कुणी येऊन सांगतील, हे शेतकरी आंदोलन तुमच्याविरुद्ध आहे." पण हे खरं नाही. हा कारखाना आजारी झाला आहे आणि याच्या आधारानं तुम्हीही जिवंत राहू शकत नाही. हे बुडणारं जहाज आहे. या बुडणाऱ्या जहाजाला जर का तुम्ही कवटाळून बसलात तर तुमच्यासकट ते जहाज खाली जाईल.
 चेअरमनची कर्तबगारी काय? एखाद्या शेतकऱ्याला म्हणतो तुझ्या पोराला नोकरी देतो, कुणाला ट्रक घेऊन देतो तर कुणाला पेट्रोल पंप. मग ज्या शेतकऱ्याच्या पोराला चेअरमनच्या कृपेने यातील काही मिळालं तो म्हणतो, नाही का, उसाला भाव मिळेना, पोराला काम तर लागलं ना! वीस एकर ऊस असण्यापेक्षा कारखान्यामधील फिटरची नोकरी चांगली. म्हणून सगळे नोकऱ्यांच्या मागे लागतात आणि तेही त्यातल्या काहीना नोकऱ्या देतात. परिणाम काय होतो? महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्यामध्ये. जिथे तीनशेपेक्षा जास्त कामगार असण्याची गरज नाही तिथं, भरमसाट माणसं भरली आहेत. तीनशेपेक्षा जास्त असणारी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२९