पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारखान्याची खरी ताकद लक्षात घेतली तर या कारखान्यात उसाचा भाव निघेल फक्त २६० रुपये! सरकारी नियम आहे म्हणून पैसे उसने घेऊन ते उसाला ४६० रुपये भाव देतील; पण पैसे उसने घेतले म्हणजे त्यावर पुन्हा व्याज द्यावं लागतं, ते पुढच्या वर्षी येणार आणि मग पुढच्या वर्षी खर्चात येणार आणि मग पुढच्या वर्षी हिशोबाने भाव निघेल तो २६० सुद्धा निघणार नाही. ५० कोटीऐवजी ६० कोटी कर्ज कारखान्याच्या डोक्यावर चढलं की पुढच्या वर्षी २५० चाच भाव निघणार. शेतकरी संघटनेने आंदोलनं केली, खुली व्यवस्था आली म्हणून निदान, या कारखान्यांच्या हिशोबातून २६० चा आकडा निघतो. आठ वर्षांपूर्वी २१८ रुपये टनाला निघतो. आठ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचा अभ्यास केला होता. त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या कारखान्याच्या हिशोबात काय समजलं? तो कारखाना त्यावेळच्या हिशोबाप्रमाणे भाव देऊ शकत होता उणे १३२ रुपये! म्हणजे शेतकऱ्याने एक टन ऊस कारखान्याला घालायचा आणि तो कारखाना चालविण्याकरिता शेतकऱ्यानेच वर १३२ रुपये द्यायचे, भाव वगैरे काही नाही.
 अशा तऱ्हेने जर हा कारखाना चालू राहिला तर यंदा ५० कोटीचं कर्ज ६० कोटीच होईल, पुढच्या वर्षी ७२ कोटीचं होईल आणि मग या कारखान्यात अशीच एक वेळ येईल की ज्यांना या कारखान्याला ऊस द्यायचा असेल त्यांनी तो कारखान्यात घेऊन जायचा आणि वर एक नोटांचीही बॅग घेऊन जायची आणि म्हणायचं हा कारखाना सहकारी आहे, "सहकार बिना नही उद्धार"
  संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक कारखाने आहेत. कित्येक याहीपेक्षा कठीण अवस्थेत असणार. मग या हातोडा मोर्चासाठी हा अंबाजोगाईचाच कारखाना का निवडला?
 महिषासुराच्या डोक्यावर नाचणाऱ्या महिषासुरमर्दिनी अंबेचे हे स्थान आहे. शेतकऱ्याला हजारो वर्षे पिळणाऱ्या या राक्षसांच्या डोक्यावर नाचण्यासाठी 'अंबा' जर पुन्हा अवतरणार असेल तर ती या जागी अवतरणार आहे या आशेने मी आलो आहे. या कारखान्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा हात आहे म्हणून मी इथं आलो नाही. मी आलो याचं कारण की मला आपले जिल्हाप्रमुख नारायण पांडे, अमर हबीब यांनी सांगितलं की या भागातले शेतकरी उठताहेत, अस्वस्थ आहेत, या विषयावर त्यांची लढाई करण्याची तयारी आहे. जिथं शेतकरी उठण्याकरिता आणि लढण्याकरिता तयार आहेत तिथं जाऊन त्यांना साथ देणं हे माझं काम आहे म्हणून मी इथं आलो आहे. आज या एवढ्याशा ट्रॅक्टर ट्रॉलीवर शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रभरचे प्रमुख कार्यकर्ते

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२६