पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



चला, दंडबेड्या तोडून टाकू


 अंबाजोगाईमधील एका वृद्ध शेतकऱ्याने शिवाजी चौकामध्ये माझ्या हातामध्ये एक हातोडा दिला आणि शिवाजी चौकातून महात्मा गांधी चौकापर्यंत तो हातोडा हाती घेऊन मी चालत चालत आलो आणि तो उंचावून मी काय तोडायला आलो आहे?
 काही आंदोलनांचा अनुभव असलेला मी माणूस आहे. हा उजव्या हाताचा कारखाना एकेकाळी शेतकऱ्यांच्या इच्छा आणि आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीचे साधन होता म्हणून उभा राहिला असेल. आज तो शेतकऱ्यांच्या सर्व आशाआकांक्षांचं थडगं बनलेला आहे. हे आमच्या उरावरचं ओझं झालं आहे; पण मी काही हा एवढा मोठा कारखाना माझ्या हातातल्या लहानशा छिन्नीहातोड्यानं तोडायला निघालो नाही. तोडायचा म्हटला तर याच्यापेक्षाही मोठमोठे इमले जमीनदोस्त करणारी साधनं आहेत, ती घेऊन आलो असतो; पण आज तो कारखाना अशा तऱ्हेने तोडण्याचा माझा मनोदय नाही. त्याची निम्मी यंत्रे गंजून गेली आहेत. आज तो उभा करायचा म्हटला तर त्याचे नट ढिले होत नाहीत आणि काढलेले नट पुन्हा बसवता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. हा कारखाना असाच राहिला तरी तो सडून जाणार आहे. त्याला साध्या हातोड्याचीसद्धा गरज नाही. आपल्या समोर जे दिसतं आहे ते जिवंत कारखान्याचं रूप नाही. ते एका काळी जन्माला आलेल्या कारखान्याचं मढं आहे, त्याला आणखी मारण्याची काही गरज नाही.
 आपण हातोडा हाती घेतला तो कारखाना तोडण्याकरिता नाही, आपण हातोडा हाती घेतला तो आपल्याच हातापायातल्या बेड्या तोडण्याकरिता घेतला आहे. हा हातोडा घेऊन आपण अंबाजोगाईमध्ये का आलो? महाराष्ट्रात १४० सहकारी साखर कारखाने आहेत. त्यापैकी कदाचित वीसपंचवीस कारखाने असे असतील की त्यांना कारखाने म्हणता येईल. बाकीचे शंभर सवाशे कारखाने हे अंबाजोगाईच्या या कारखान्याप्रमाणेच थडगी झाले आहेत. तुमच्याकडे भाव किती निघेल? आज

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२५