पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही स्टेशन नाही, स्वातंत्र्य हा मार्ग आहे. स्वातंत्र्याचा उपभोग घेता घेता स्वातंत्र्याच्या नवीन दिशा मनुष्य अनुभवून घेत असतो. आपल्याला त्या दिशांचा अनुभव अजून यायचा आहे. उत्पादनांच्या साधनांमध्ये निसर्ग, माणूस, भांडवल, उद्योजक अशी साखळी असते. अर्थशास्त्रात त्याला जमीन (Land), श्रम (Lobour), भांडवल (Capital) आणि उद्योजक (Entrepreneur) असे चार शब्द आहेत.
 मनुष्यसमाजाच्या ज्या पहिल्या संस्कृती तयार झाल्या त्या निसर्गाच्या औदार्यावर आधारलेल्या संस्कृती होत्या. नदीच्या काठी, नदीच्या वळणावर-जिथे गाळ मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकला जातो त्याच्या बाजूला मोठी मोठी नगरे वसली. ही निसर्गाच्या औदार्यावर आधारलेली शहरे.
 शेतीबरोबर माणसांच्या हातांवर - श्रमशक्तीवर आधारलेली संस्कृती उभी राहिली. यात माणसाच्या श्रमशक्तीचा उपयोग दुहेरी झाला. उत्पादकतेकरिता शेतकऱ्यांच्या रूपाने, बलुतेदारांच्या रूपाने आणि (दुर्दैवाने) हातात तलवारी घेतलेल्या सैनिकांच्या रूपाने; पण श्रमशक्तीचं महत्त्व असलेल्या संस्कृती दुसऱ्या टप्प्यामध्ये तयार झाल्या.
 मग बचत (Surplus) तयार झाली त्या बचतीचा उपयोग धर्माकरिता झाला, मग जमीनदारीकरिता झाला, मग भांडवल निमिर्तीसाठी झाला. संस्कृतीची तिसरी पायरी जी आली ती भांडवलशाही. तिच्यामध्ये निसर्गापेक्षा आणि माणसांपेक्षा भांडवलातून निर्माण झालेल्या साधनांना जास्त महत्त्व आले. भांडवलशाहीचे दोन टप्पे. एक खुली भांडवलशाही आणि दुसरा हुकूमशाही भांडवलशाही. भांडवलावर म्हणजे साधनांवर आधारलेल्या संस्कृतीमध्ये समाजवादी व्यवस्था आणि भांडवलवादी व्यवस्था या दोन सख्ख्या बहिणी आहेत.
 आता चौथी संस्कृती येते आहे. तिच्यामध्ये निसर्गाला प्राधान्य नाही, परिपाठी श्रमाला प्राधान्य नाही आणि केवळ भांडवलालाही महत्त्व नाही. येते आहे ती उद्योजकांची संस्कृती. भांडवलाची चार साधनं एकत्र करणाऱ्या 'योजकस्तत्र दुर्लभः' मधील योजकांची, काम करणारांची संस्कृती पुढे येते आहे. उद्योजकांची संस्कृती पहिल्यांदा तयार होते आहे. म्हणजे भांडवलशाही व समाजवाद याच्या पुढच्या पायरीकडे आपण जातो आहोत.
 इतिहासाचा खरा अर्थ
 १९८० सालापासून साम्यवादी आणि समाजवादी यांच्याशी चर्चा करताना मी आग्रहाने सांगत आलो आहे की मी मार्क्सवादी आहे एवढंच नव्हे तर मी एकटाच मार्क्सवादी आहे. बाकीचे मार्क्सवादी मार्क्सवादी नाहीतच. असं आहे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२१