पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिमान बाळगणाऱ्या अनेक लोकांची उदाहरणे नीतिशतकात आहेत. रामशास्त्री प्रभुण्यांचं उदाहरण तर आपल्या इतिहासातलं ताजं उदाहरण आहे. अशा तऱ्हेचे विद्वान आजच्या लोकशाही समाजवादाच्या व्यवस्थेत होत नाहीत. मुख्यमंत्री आले तर विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा उठून उभे राहतात. एका कुलगुरूंनी सांगितले की मुख्यमंत्रीच काय, मुख्यमंत्र्यांचा चपराशी जरी आला तरी आम्ही उठून उभे राहतो.
 म्हणजे, समाजवादाचा आणखी काय परिणाम होतो? माणसातली विविधता नाकारणे, माणसाला बाहुले बनविणे, इतकेच नव्हे तर त्याचं अनन्यसाधारणत्व नाकारणे इतका बलात्कार समाजवादाने मनुष्यजातीवर केला.
 माणसाचं वैशिष्ट्य काय? जनावर नाही तो; त्याची काही प्रेरणा आहे, त्याची उद्योजक ताकद आहे. ती नष्ट करण्याचं कार्य समाजवादानं केलं.
 या समाजवादाला आमचा विरोध आहे.
 नेहरूवाद व समाजवाद
 दुसरा मुद्दा उपस्थित होतो की नेहरूवाद आणि समाजवाद यांचा काय संबंध आहे? हिंदुस्थानात समाजवाद कधीच आला नाही. जे काही आलं त्याला आम्ही मिश्र व्यवस्था म्हटलं. मिश्रव्यवस्था म्हणजे सरकारी व्यवस्था करायची आणि खाजगी खुलं क्षेत्रही ठेवायचं आणि समाजवादी क्षेत्रही आहे. या समाजवादाचा उपयोग लायसेन्स-परमिट राज्यात करून सगळ्या उद्योजकांना वाव द्यायच्या ऐवजी फक्त आपल्या जवळच्या निवडक कारखानदारांना वाव द्यायचा. समाजवादाचा असा वापर करणारी व्यवस्था म्हणजे नेहरूव्यवस्था. तिच्यामध्ये समाजवादाचेही गुण नाहीत आणि भांडवलशाहीचेही गुण नाहीत. केवळ निवडक लोकांच्या स्वार्थापोटी व्यक्तीच्या अनन्यासाधारणतेचा गळा घोटणारी ही नेहरूव्यवस्था.
 समाजवादाची व्यवस्था कोसळली आणि त्या पाठोपाठ नेहरूव्यवस्थाही कोसळली. समाजवादी व्यवस्था कोसळल्यानंतर खुल्या अर्थव्यवस्थेकडे जाणे म्हणजे पुन्हा भांडवलशाहीकडे जाणे आहे काय? नाही. समाजवादाचा पाडाव झाला, त्याच्याबरोबर भांडवलशाहीचाही पाडाव केव्हाच झाला. भांडवलशाहीच्या काळामध्ये खुली व्यवस्था कधीही नव्हती. भांडवलशाहीमध्ये मक्तेदारी बाजारपेठ होती. समाजवादामध्ये समाजवादी सरकारी बाजारपेठ एवढाच फरक झाला. खुली बाजारव्यवस्था अजून जगात जन्माला यायची आहे.
 संस्कृतीचे टप्पे
 खुली बाजारव्यवस्था हे काही स्टेशन नाही, हा रस्ता आहे. स्वातंत्र्य हे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२०