पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर मग समाजवादाचा विरोध का? मार्क्सवादातही ग्राह्य भाग आहे. तो कोणता हे समजून घेतलं नाही तर मार्क्सवादी समाजवाद फेकून देताना 'घंघाळातल्या पाण्याबरोबर बाळही फेकून दिलं' असं होईल.
 मार्क्सवादात ग्राह्य भाग कोणता आहे? मार्क्सचा अर्थवाद टाकाऊ होता, निरर्थक होता. मार्क्सचं सामाजिक विश्लेषण चुकीचं होतं; पण मार्क्सने केलेली एक मांडणी अत्यंत महत्त्वाची आहे. 'सर्व समाजाची प्रेरणा वस्तूंचं वैपुल्य मिळवायची आहे' ही ती मांडणी होय. हे वस्तूंचं वैपुल्य कशासाठी मिळवायचे याबाबत मार्क्सवादी कधी काही बोलत नाहीत. मार्क्स (Nonalienation) असा शब्द वापरतो; अद्वैतभाव, निसर्गाशी एकरूप होणे. मनुष्यप्राणी जन्माला आला पण निसर्गाच्या वैपुल्याच्या समद्धीपुढे त्याला निसर्गाशी एकरूप होणे जमत नाही. त्यामुळे शेती म्हणजे शेतीच करणं, नोकरी म्हणजे नोकरीच करणे असे त्याला करावे लागते. खरे तर सकाळी नदीवर जाऊन मासे मारले, दुपारी शेती केली, संध्याकाळी कविता लिहिल्या, रात्री आणखी काही केलं अशा तऱ्हेचा माणसाचा स्वभाव; पण ते सगळ्यांनाच जमत नाही. तेव्हा, वस्तूंची विपुलता तयार करणे हा संबंध इतिहासाचा खरा अर्थ. म्हणून मार्क्सने जडवादी इतिहासाची मांडणी केली. इतिहास घडतो तो राजांचा इतिहास नसतो, राजघराण्यांचा इतिहास नसतो, राजांच्या शौर्याचा इतिहास नसतो. इतिहास घडविणारे प्रवाह हे जडवादाशी, सामान्य माणसाच्या उपभोगाशी संबंधित असतात. राजढ, राजघराणी, त्यांचे पराक्रम हे या प्रवाहावर क्षणकाल नाचणारे केवळ बुडबुडे किंवा छोट्या होड्या असतात. मार्क्सने केलेली ही इतिहासाची मांडणी हे त्या घंघाळातील बाळ आहे. आम्ही ही मांडणी ग्रह्य धरतो.
 स्वातंत्र्याच्या कक्षा
 आपण याच्यापुढेही जाऊन अद्वैतभाव (non-alenation) च्या ऐवजी 'स्वतंत्र्याच्या कक्षा' (Degree of freedom) असा शब्दप्रयोग वापरतो. गुणवत्तावाचक शब्दाऐवजी संख्यावाचक शब्द वापरण्याचे हे चांगले उदाहरण आहे. माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता कशी ठरवायची, त्याचं आयुष्य चांगलं चाललं आहे का नाही हे कसं ठरवायचं? सामान्य माणूस उपभोगासाठीच, सतत वाढत्या उपभोगासाठीच जगत असतो. उपभोग, वाढत्या गुणवत्तेचा उपभोग हीच त्याची प्रेरणा असते. त्याचं भलं कुठं ईश्वरात नाही आणि अल्लातही नाही. विनोबाजींना एकदा एकाने प्रश्न विचारला की, 'तुमचा देवावर विश्वास आहे म्हणता तर समोर हा जो दिवा जळतो आहे तो ज्या अर्थाने आहे त्या अर्थाने परमेश्वर आहे असे तुम्ही म्हणता का?" त्यावर विनोबाजींनी उत्तर दिले की,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२२