पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लुबाडली आणि लोकांमध्ये लोकप्रिय घोषणा देऊन आपली सत्ता अधिक मजबूत केली आणि सक्षम उद्योजकतेचा घात केला. त्यांनी गरिबांचं भलं काहीही केलं नाही.
 अर्थकारणात डोकी मोजून चालणार नाही
 आपण जेव्हा फायद्याविषयी बोलतो तेव्हा आपण खुल्या अर्थव्यवस्थेविषयी, खुल्या बाजारपेठेविषयी बोलतो. प्रत्येक व्यवस्थेच्या काही फुटपट्ट्या असतात. आपल्या सध्याच्या राजकारणात एक अशीच फुटपट्टी मानतात. ती म्हणजे डोकी मोजणे. आज मते मोजणे म्हणजे डोकी मोजणेच आहे. या फुटपट्टीने आजच्या राजकारणात सर्व माणसे समान आहेत. आळशी माणसाला एक मत, उद्योजकाला एक मत, टाटाला एक मत, किर्लोस्करला एक मत, ग्यानबालाही एक मत. खरं तर डोकी मोजणे म्हणण्यापेक्षा पाय मोजून त्याला दोनने भागणे आणि तितकी मते अशी ही फुटपट्टी म्हणावी लागेल. अर्थकारणामध्ये निर्णय घ्यायचा तर डोकी मोजण्याची फुटपट्टी वापरून चालत नाही. अर्थकारणात ही फुटपट्टी वापरली तर काय परिणाम होतो याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याकडील सहकारी संस्था होत. ही फुटपट्टी वापरल्यामुळे तिथं व्यवसाय होऊ शकत नाही. अर्थकारणातील व्यवस्थेची फुटपट्टी पैसा असली पाहिजे. शेअर्स मोजा. जितके शेअर्स तितकी मते अशी फुटपट्टी असली तरच व्यवसाय करू शकणारी माणसे तिथे नेमली जातील. विद्येच्या क्षेत्रात काय फुटपट्टी असावी? आज जो तो स्वतःला विद्वान म्हणवतो आणि कुलगुरूच्या यादीत जाऊन बसतो आणि कुलगुरूच्या निवडीच्या परीक्षेत काय करून पास होतो याची कुणाला माहितीही मिळत नाही. न्याय ही आणखी एक प्रेरणा आहे; पण न्यायाधीशही अशाच चुकीच्या फुटपट्टीने निवडले जातात. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रातल्या प्रेरणांशी निष्ठा राखणाऱ्या फुटपट्ट्या तयार करता न आल्यामुळे सगळ्यात सोप्या, डोकी मोजण्याच्या फुटपट्टीकडे वळतात.
 राजेशाहीत वेगवेगळ्या प्रेरणांच्या वेगवेगळ्या फुटपट्ट्या होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या फुटपट्ट्या वेगवेगळ्या असतात, असाव्यात याची अनेक उदाहरणे नीतिशतकात आहेत. एक कवी राजाच्या दरबारात राजाला म्हणतो, "अरे, तू भलाही राजा असशील पण मीसुद्धा माझ्या ज्या गुरूची सेवा केली त्याचा मला मोठा अभिमान आहे. तुझं सैन्य असेल, माझाही मोठा शिष्यपरिवार आहे. तू युद्धामध्ये शौर्य गाजवत असशील, तर मी वादविवादामध्ये मोठा प्रख्यात म्हणून गाजलेला आहे आणि तुला जर माझी पर्वा नसेल तर मलाही तुझी पर्वा नाही." अशा तऱ्हेने आपापल्या प्रेरणाक्षेत्रांत स्वतःच्या फुटपट्ट्या तयार करून स्वतःचा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११९