पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शकत नाहीत. बाजारपेठेत होणारे निर्णय चांगले असतात. बाजारातील निर्णयही चुकीचे असतील. पण जे काही बाजारात घडेल तोच न्याय. बाजार ही पद्धतही दोषास्पद आहे. पण बाजारापेक्षा चांगली पद्धत अजून माणसाला सापडलेली नाही. ज्याच्या गळ्यात माळ पडते तो सर्वांत लायक आहे असे थोडेच असते? सर्वात जास्त शर्यती जिंकणारा घोडा सर्वोत्तम असतो हेही खरे नाही. बाजार वाईट नाही आणि बाजार ही सर्वोत्तम गोष्ट आहे असेही नाही; पण याच्यापेक्षा चांगली पद्धत अजून माणसाने शोधून काढलेली नाही ही गोष्ट समाजवादी देशांतील लोकनेतेसुद्धा मान्य करू लागले आहेत.
 स्पर्धेचे तत्त्वज्ञान
 मग आपण शेतकरी संघटनेच्या विचारावर येतो की समाजवादी नियोजनपद्धतीत नियोजन करणारांनाच सर्वांत जास्त वाव मिळतो. समाजातील व्यक्तींचा विकास होत नाही आणि दीनदुबळ्यांचाही नाही. तेव्हा नियोजनपद्धतीचा त्याग करून प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वावर निष्ठा राखून आपापल्या स्वार्थाकरिता आपापल्या फायद्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. गरीब, दीनदुबळ्यांच्या बाबतीत नंतर विचार करू. ऑलिंपिकसारख्या स्पर्धांचे आयोजन करताना आपण लंगड्या पांगळ्यांचा विचार करीत नाही. धडधाकटांचाच विचार करतो. अपंगांसाठी वेगळ्या स्पर्धा भरवायच्या किंवा काय यावर नंतर विचार करतो. तसं, ज्या व्यक्ती सुदृढ आहेत, सक्षम आहेत, स्वतःचं हित पाहू शकतात अशा व्यक्तींमध्ये आपापला विकास करण्याची स्पर्धा हाच समग्र समाजाच्या कल्याणाचा मार्ग आहे हे शेतकरी संघटनेचे मूलभूत तत्त्व आहे.
 अपंग, दुर्बलांसाठी लंगर
 अनन्यसाधारण असलेल्या सर्व सक्षम व्यक्तींमधील स्वार्थाकरिता, स्वतःच्या फायद्याकरिता निकोप खुली स्पर्धा हाच समाजाच्या विकासाचा मार्ग आहे अशी मांडणी केली की समाजवादी नियोजनाची सवय झालेल्यांकडून काही प्रश्न येतात. पहिला प्रश्न, मग गरिबांचं, अपंगांचं, दीनदुबळ्यांचं काय? माझ्या मनात अपंगांविषयी जी भावना आहे तिला करुणा किंवा सहानुभूती म्हणणं चुकीचं होईल. शाळेतील एखाद्या वर्गामध्ये असणारी मुलं काही निवडून आणलेली नसतात. त्यांतील काही उंच असतात काही बुटकी, काही नकटी. आपण बियाणं तयार केलं तर त्यात लहान, मोठं, चांगलं, पोचट असं निघतंच. तसंच, मनुष्य जातीच्या प्रत्येक पिढीमध्ये जी काही नवीन 'लोकसंख्या' तयार होते त्यामध्ये काही लोक सुदृढ तर काही अपंग, दुर्बल असणे अपरिहार्य आहे. सुदृढ, सक्षम माणसांचं प्रमाण जास्त असतं, अशा सुदृढ सक्षम समाजामध्ये संख्याशास्त्रीय

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११७