पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 फायद्यावर दृष्टी ठेवून जेथे इतर निर्णय होतात तेथे बाजारपेठेतील मागणी कमी पडते, मंदी येते, समाजाची उत्पादन करण्याची ताकद असूनही केवळ फायद्याचा विचार करणाऱ्या लोकांच्या बुद्धीमुळे समाज दरिद्री राहतो, समाज नीट चालायचा असेल, वैभवशाली बनवायचा असेल तर फायदा ही गोष्ट राहता कामा नये, फायदा असेलच तर त्याचं राष्ट्रीयीकरण करा, समाजवादी नियोजन करा, सगळे लोक समान आहे, ते सर्व सुखी होऊन जातील असा मार्क्सवाद्यांच्या तथाकथित शास्त्रीय समाजवादाचा सारांश आहे.
 अर्तिनाशन झालं नाहीच
  'आर्तिनाशना'चं भयानक रूप या शास्त्रीय समाजवादाच्या नावाने पुढं आलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या विचारानं शंभर वर्षे मनुष्यजातीचं 'हायजॅकिंग' केलं. जो जो कोणी मनुष्यजातीचा विचार करणारा झाला त्याने त्याने या समाजवादाच्या प्रभावाखालीच विचार मांडला. समाजवाद म्हणजे व्यक्तीप्रेरणांनी चालणारा, अनन्यसाधारण असणाऱ्या व्यक्तिंच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी निष्ठा राखण्याच्या सामूहिक प्रयत्नांतून निर्णय घेण्याची व्यवस्था असे न मानता माणूस महत्त्वाचा नाही, समाज महत्त्वाचा, या समाजाच्या हितासाठी जे निर्णय होतात तेच योग्य असे मानणारी व्यवस्था अशी व्याख्या जो तो करीत राहिला. यातूनही समाजाचं हित साधलं असतं तरी हरकत नव्हती. पण आता सिद्ध झालं आहे की या अशा समाजवादानं समाजाचं हित काही झालंच नाही.
 समाजवादाचा आधीच अंत
 खरं तर, आज या विषयावर चर्चा करण्याची गरजही नाही. आपलं शेतकरी आंदोलन सुरू झालं त्यावेळी, १९८० साली अनेक समाजवाद्यांना गोळा करून त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की, 'तुमच्या या समाजवादानं समाजाचं भलं होणं शक्य नाही. तुमची कल्पना चुकीची आहे. कामगारांच्या बचतीतून भांडवल तयार होतं असं मार्क्सनं जे मांडलं आहे ते खरं नाही. भांडवल तयार होतं ते शेतकऱ्यांच्या बचतीतून तयार होतं. नाहीतर, औद्योगिक भांडवल तयार करण्याकरिता स्टॅलीनला शेतकऱ्यांवर रणगाडे फिरविण्याची गरज पडली नसती. ज्या दिवशी स्टॅलीनने शेतकऱ्यांवर रणगाडे पाठविले त्याच दिवशी मालमत्तेच्या समान वाटपावर आधारलेला समाजवाद संपला आहे; आता फक्त त्याचं दफन व्हायचं बाकी आहे.'
 आम्ही हे १९८० सालापासून सांगत आहोत, पण कुणी मानायला तयार नव्हते. पण आता हा चर्चेचासुद्धा विषय राहिला नाही. गोर्बाचेव्हपासून सगळ्यांनी मान्य केलं आहे की समाजवादाच्या नियोजनाने होणारे निर्णय बरोबर असू

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११६