पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशी बहुतेकांची स्थिती. सततच्या संरक्षणामुळे, आधारामुळे परावलंबी झालेल्या माणसाची स्थिती कशी होते? चांदवडच्या महिला अधिवेशनात एका कार्यकर्त्या बहिणीने सांगितलेली हकीकत उदाहरण म्हणून पुरेशी बोलकी आहे. चांगली पन्नाससाठ वर्षांची बाई, संध्याकाळ झाली की किंवा दिवसांसुद्धा घराबाहेर पडायचं असेल, पाच वर्षाच्या लहान मुलाला बरोबर घेते आणि म्हणते, 'पुरुष माणसाची सोबत असलेली बरी.' तशी, स्वातंत्र्याची जाण विसरलेली माणसं, 'आमच्याकडं सरकार अजिबात बघणार नाही, यंदा महापूर आला तर काय करायचं, काही भयानक झालं तर आमच्या मदतीला कोण येणार?' असं म्हणतात आणि स्वातंत्र्याकडे पाऊल टाकण्याआधीच त्यांचे हातपाय थरथरायला लागतात.
 स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा विकास

 मनुष्य जन्मतःच स्वतंत्र नाही. उत्क्रांतीमध्ये मनुष्यप्राण्याची उत्पत्ती झाली तेव्हा तो टोळीमध्ये होता आणि टोळीमधील व्यक्तिगत स्वातंत्र्य कमी होतं. टोळीच्या मानाने राजेशाहीत माणसाला स्वातंत्र्य अधिक मिळालं. आज आपल्याला राजेशाही गुलामीची वाटते पण राजेशाहीत टोळीपेक्षा जास्त स्वातंत्र्य होतं. राजेशाहीकडून आपण लोकशाहीकडे आणि लोकशाहीकडून भांडवलशाहीकडे गेलो; भांडवलशाही बरोबरीने समाजवादाचा प्रयोग झाला. प्रत्येक वेळी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं पाऊल पुढे पडत गेलं. आता आपण त्याच्या पुढच्या स्वातंत्र्याचं पाऊल टाकत आहोत. स्वातंत्र्याचं प्रत्येक पुढचं पाऊल टाकताना प्रत्येक पायरीला माणसं घाबरत राहतात. आपल्या गुलामीच्या दाहकतेची त्याला जाणीव नसते. मोकळं झाल्यानंतर त्यांना कळतं की आपण स्वतंत्र झालो; पण हातात बेड्या असताना बेड्या काही टोचत नाहीत. नोकरी ही गुलामीच आहे. नोकरी करणाऱ्या माणसाला खरं तर शरम वाटायला पाहिजे. तो कोण्या एका मालकाच्या किंवा साहेबाच्या ऑफिसमध्ये जातो, मान खाली घालून ठराविक वेळेपर्यंत काम करीत राहातो, तो बोलेल ते ऐकून घेतो. का? तर, काहीही उपयोगाचं केलं नाही तरी महिन्याच्या एक तारखेला पगार मिळतो आणि पोट भरतं. ही पगारी गुलामगिरी आपण स्वीकारली आहे. त्या बेडीची जाणीव नाही. पण ती तुटणार आहे.
 लढ्याचं पहिलं पाऊल
 मनुष्य टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्याकडे जातो आहे, परंतु प्रत्येक वेळी पाय आखडत जात आहे. ज्यांना स्वातंत्र्य नको त्यांचे पाय अडखळतात. स्वातंत्र्याची कल्पना मांडली तर तुम्ही भांडवलवादी आहात, तुम्ही अमेरिकेचे पित्ते आहात, तुम्ही मोठ्या शेतकऱ्यांच्या बाजूचे आहात असे आरोप होणार आहेत. मग स्वातंत्र्याचा लढा पुढे नेण्याचं पहिलं पाऊल आज कोणतं आहे? समाजवाद

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११०