पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्या' म्हणून हात पसरणारे भिकारीच फक्त या देशात आहेत; आम्ही आमच्या पायावर उभं राहायला तयार आहोत असं म्हणणारे लोक या हिंदुस्थानात नाहीत; पण आपण, शेतकरी संघटनेचा विचार मानणारे तसे आहोत; निदान आपली तशी धारणा आहे की आपण तसे आहोत.
 हा मुद्दा मांडायचा असेल आणि लढाई उभी करायची असेल तर वेगवेगळी साधनं आहेत. आपण शेतीमालाच्या भावाची मागणी करतो म्हणजे आपण बाजारपेठेवर चालणाऱ्या खुल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. पण असे म्हटले की तुमच्यावर लगेच आरोपांच्या फैरी सुरू होतील. चक्रवर्ती राजगोपालाचारींसारख्या माणसांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यावर नेहरूंसारख्यांच्या माणसांनी 'हे सगळे संस्थानिकांचे प्रतिनिधी आहेत, कारखानदारांचे प्रतिनिधी आहेत' म्हणून त्या पक्षाला बदनाम केलं. आकडेवारी पाहिली तर, १९६७ च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्षातून निवडून आलेल्या ४५ खासदारांपैकी ३४ शेतकरी होते, ८ राजेरजवाडे आणि दोनतीन दांडेकर-मसानी. नागपूरला (काँग्रेस अधिवेशनात) जेव्हा सामूहिक शेतीची कल्पना मांडली गेली व कमाल जमीनधारणेचा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा त्याच्या विरोधात स्वतंत्र पक्षाचा जन्म झाला. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांची बाजू मांडणारा, त्यांच्या वतीने खुली व्यवस्था मागणारा त्यावेळी कुणी नव्हता. उद्योजक शेतकरी तयार झाला नव्हता; सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला शेतकरीच सगळीकडे होता. त्यामुळे स्वतंत्र पक्षाला बदनाम करण्यात आलं. आजसुद्धा मी असो किंवा तुम्ही असा, खुल्या व्यवस्थेचा पुरस्कार केला तर 'यांच्यापासून गरिबांना धोका आहे' असं म्हणून गरिबांच्या नांवावर लठ्ठ होणारे लोक टीका करायला सुरुवात करणार आहेत. तेव्हा, खुलेपणाचं तत्त्वज्ञान घेऊन पुढं जाणं तसं कठीण आहे.
 स्वातंत्र्याची हरवलेली संवेदना
 दुसरा मुद्दा असा की खुलेपणाचं तत्त्वज्ञान घेऊन कुणाकडं जायचं? जी मंडळी आपल्यात गेली दहाबारा वर्षे काम करताहेत त्यांच्या मनांतसुद्धा प्रश्न निर्माण होतात की, बाजारपेठेत एखाद्या वर्षी भाव मिळाला नाही तर काय करायचं,शेतकरी मल्टीनॅशनल्सशी कसा काय सामना करणार? शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांची ही स्थिती मग नोकरदार, पुढारी, कारखानदार यांची स्थिती विचारायलाच नको.
 खुली व्यवस्था हवीच कुणाला? खुलेपणाचं तत्त्वज्ञान घेऊन कुणाकडे जायचं? केवळ खुल्या व्यवस्थेचं नांव काढलं, स्वातंत्र्य म्हटलं की बहुतेक लोकांचे पाय लटलटा कापायला लागतात. 'स्वातंत्र्य असं नको, माझं बोट धरून चालवा'

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०९