पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झुगारून स्वातंत्र्य मागणाऱ्यांनासुद्धा निवडणुका लढविण्याचा अधिकार मिळविणे हे या लढ्यातील पहिलं पाऊल आहे आणि इंदिरा गांधींनी आपल्याला या लढाईसाठी सोय करून ठेवली आहे. शेतकरी संघटनेच्या सुरुवातच्या काळात मी म्हणत असे की राव वीरेंद्र सिंग नसते तर संघटना एवढी काही पसरली नसती. कारण त्यांची वक्तव्येच मुळी शेतीच्या लुटीचा पुरावा देणारी आणि शेतकऱ्यांच्या असंतोषाला ठिणगी लावणारी असत. त्याचप्रमाणे इंदिरा गांधींची ४२ वी घटना दुरुस्ती आपल्याला या लढाईत उपयोगी पडणार आहे. या घटनादुरुस्तीत त्यांनी समाजवादाची शपथ घेण्याचं कलम घातलं.
 आपण जेव्हा समाजवाद नाकारून निवडणुकीचा हक्क मिळविण्याच्या लढ्याची भूमिका मांडू तेव्हा लोक विचारणार आहेत, 'समाजवाद शब्दात काय वाईट आहे?' कारण, जो तो म्हणतो की, 'मी समाजवादी आहे.' समाजवाद कशाशी खातात याची ज्यांना अजिबात माहिती नाही अशी माणसेसुद्धा मी माणूस आहे, मी श्वास घेतो या धर्तीवर मी समाजवादी आहे असे सहजतः म्हणतात. विचार करणारा माणूस समाजवादी असायचाच असं गृहीत धरून चालतात. पंचवीसतीस वर्षे मार्क्सवादी म्हणून समाजात मिरवलेल्या माणसांनासुद्धा समाजवाद म्हणजे काय सांगता येईलच असे नाही. धुळ्याला अशाच एका रॅशनल ह्यूमॅनिस्ट गृहस्थांनी, 'समाजवाद म्हणजे जे काही आहे ते सगळ्यांनी सारखं वाटून घ्यायचं' अशी व्याख्या केली होती. मार्क्सच्या संकल्पनेच्या जवळपाससुद्धा न जाणारा अर्थ जुन्या पिढीतले मार्क्सवादी समाजवादाला देत असतात तेथे इतरांची काय कथा?
 स्वतंत्र हिंदुस्थानची घटना बनत असताना कुणीतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की, "समाजवादाची योजना काय वाईट आहे?" घटनेमध्ये 'समाजवादी' शब्द का घालत नाही?" आंबेडकर काही साम्यवादी किंवा समाजवादी नव्हते. ते म्हणाले की, "घटनेच्या माझ्या मसुद्यामध्ये समान आर्थिक संधी, समान सामाजिक न्याय वगैरे संकल्पना आहेत त्यांच्यापेक्षा समाजवाद काय वेगळा असतो?" म्हणजे बाबासाहेबांनासुद्धा समाजवाद म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना नव्हती. तरीसुद्धा आज रावसाहेब कसब्यांसारखे समाजवादी बाबासाहेबांविषयी लिहिताना त्यांचा मार्क्सवादाचा अभ्यास फार चांगला होता असं लिहितात.
 आर्तिनाशनाची रूपे

 समाजवादाच्या या लोकप्रिय प्रेरणेचा उगम कशात आहे? या प्रेरणेचा उगम धर्मव्यवस्थेमध्ये, संतांच्या भक्तिमार्गामध्ये, सूफी पंथामध्ये आहे. स्वतःसाठी जगला तो काही खरा नव्हे, स्वार्थ सगळेच साधतात; पण ज्या काळात घनघोर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १११