पान:महाबळेश्वर.djvu/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२ )



नुसते भिक्षुकीवर चालतो. येथील सर्व बाह्मण मंडळी एक गोत्री असल्यामुळे, एकमेकांचा गांवचे मिळकतीत फायदा होण्याचा संभव नाहीं. तेव्हां यांचा आणि गावांतील दुस-या १०,१२ गुरव कुटुंबांचा निर्वाह देवांच्या यात्रेकऱ्यांंकडून होणा-या मिळकतीवर अवलंबून आहे हें वाचकांच्या सहज लक्षांत येईल. या करितां या देवळासंबंधीं विशेष माहिती देणें अवश्य वाटल्यावरून त्याबद्दल वर्णन पुढे दिलें आहे.

 या क्षेत्रांत महाबळेश्वर, अतिबळेश्वर, कोटेश्वर व कृष्णाबाई यांचीं देवळे फार जुनाट आणि काळ्या दगडांनीं बांधलेलीं आहेत. ही बांधून निदान ५०० वर्षोवर वर्ष झाली असावींं असें अनुमान केलें आहे. तथापि त्यांस अद्याप पावेतों मुळींच भंग नाहीं. ह्या जुन्या देवळांची दुरुस्ती सुमारें २०० वर्षामागें सातारचे परशराम नारायण अनगळ यांनीं केली होती. या शिवाय सन १८७५ साली श्रीमंत जमखिंडीकर साहेब यांनीं १५००० रू खर्च करून कृष्णाबाईचे देवळास पत्रा घातला आणि जीर्णोद्धार केला.