उत्तर असें आहे कीं,-उभ्या वर्षाचें भाडें येथें एप्रिल व मे या दोन महिन्यांत उभे करावें लागतें. म्हणजे बारा महिन्याचें भाडें या दोन महिन्यांच्या सीझनवर किंवा ऋतूवर लादावें लागतें ! व त्यामुळे दिसण्यांत त्या भाडयाची रकम फार जबर दिसते. पण वास्तविक पाहतां इतकें भाडे घेऊन घरांच्या मृालकांस म्हणण्यासारखा फायदा होत नाहीं. बाकीच्या गांवोगांव घरांत कोणी रहात नसल्यास कुलूप घालून जातां येतें, परंतु येथें त्यास निदान पावसाळ्यांत कुलूप लावून ठेऊन चालत नाहीं. कारण पर्जन्यातिशयामुळे पावसाळ्यांत घराचा बचाव करण्यास गवताचा वगैरे बराच खर्च लागतो; व त्यावर नेहमीं नजर ठेवावी लागते; तथापेि ज्याप्रमाणे बाजारांत येणारा माल आणि तो घेणाऱ्या ग्राहकांची संख्या यांचा एकमेकांवर परिणाम घडतो, त्याप्रमाणें येथें जसजशी अधिक अधिक सोईचीं घरे मिळू लागतील तसतशी आरामासाठीं येणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाईल असा आमच्या स्वतःच्या घरांवरून आम्हास अनुभव आला आहे.