कोणत्याही एकावर, दोहींवर किंवा साऱ्या तिहींंवर मनुष्यास आपला चरितार्थ करतां येतो. शिकार करणें; मेंढरें, गाई, म्हशी, वगैरे जनावरें पाळून दूधदुभतें करणें; आणि जमीन तयार करून तींत धान्य भाजीपाला, फळफळावळ उत्पन्न करणें - या तीन गोष्टीपैकीं पहिलीपेक्षां दुसरीस, व दुसरीपेक्षां तिसरीस अधिक श्रम, अधिक आत्मसंयमन व अधिक दूरदृष्टी लागते, हें सहज समजण्यासारखे आहे. तेव्हां ज्या लोकांत उपजीविकेचीं हीं तिन्हीं साधनें अस्तित्वांत आलीं असून त्यांची अवश्यकता पडू लागली असेल, ते लोक पहिल्या किंवा दुसऱ्या साधनांनीं उपजीविका करणारे लोकांपेक्षां अधिक उद्योगी असले पाहिजेत हें उघड आहे!
फक्त मनुष्यमात्र या तीन प्रकारच्या आहारांपैकीं पाहिजे तों आहार करून राहूं शकतो. पण जसजशी त्याला उन्नतावस्था येत जाते, तसतसा त्याचा मांसाहार कमी होत जाऊन उद्भिज्जाहार वाढूं लागतो, असें कित्येकांचें मत आहे. पण येथें विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं, मनुष्याशिवाय इतर