पान:महाबळेश्वर.djvu/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६८ )

 एकमेकाबरोबर युद्ध करण्यास महा राक्षस उठल्याप्रमाणेंं कोणी वांकडातिकडा, कोणी नीट, कोणी दुसऱ्याच्या अंगावर रेललेला, कोणी झोंंबी खेळण्यास चाललेला असे डोंगर दृष्टीस पडतात.

 उजवे बाजूस एलफिन्स्टन पाइंट व सावित्रीचा भयंकर खोल दरा आपल्याकडे टेहळून पाहत असतो. तो वरून एक मैल रुंद व दोन मैल लांब असावा असा दिसतो. या दऱ्याच्या दुसऱ्या बाजूला एलफिनस्टन पाइंट कड्याचा प्रेक्षणीय भाग आहे या अंगास नदीकिनाऱ्यानेंं गर्द झाडी, हिरवी गार पिकें अगदी आच्छादित होऊन गेलींं असतात. अशीच पलीकडे नजर फेंकिली ह्मणजे सावित्री नदी महाडावरून माहेराहून सासरी जात असल्याप्रमाणेंं सावकाश समुद्रकिनाऱ्यावरून वाहत चालली आहे असेंं दिसतेंं. येथून उत्तर कोंकण प्रदेशांतील लहानसान टेंंकड्या सोंगटया मांडल्याप्रमाणे दिसतात. तशा दुसरे कोणत्याही ठिकाणापासून दिसत नाहींंत.