पान:महाबळेश्वर.djvu/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५९ )

 राम उंबरठयाच्या आंतल्याआंत असल्यामुळे शारीरिक समृद्धिपेक्षां मानसिक सुखाच्या लहरीत ते अगदीं गढून गेलेले असतात. बाहेरील उघडया हवाशीर ठिकाणीं, सकाळ सायंकाळ फिरून येण्यापलीकडे, यांजकडून जास्त कालक्रमण होत नाहीं. दुपारीं किंवा रात्रींच्या वेळीं त्यांच्या बंगल्यांतून खेळ, गाणें, किंवा शिळोप्याच्या गप्पा मारणें या व्यवसायांत आपल्या मित्रमंडळीसह ते गर्क होऊन गेलेले असतात. कोणी कोणी बडे लोक आपल्या बंगल्याचे कंपौंंडांतच टेनिस कोर्ट तयार करून आपल्या सौंगडयाबरोबर खेळ खेळत असतात. कित्येक वेळीं जिमखान्याच्या जागीं जाऊन साहेब लोकांच्या नानाप्रकारच्या घोडयावरील वगैरे खेळांचे चमत्कारही पहावयास कित्येक जातात. त्यांच्या क्रीडा पाहून वेळ कसा आनंदानें घालवावा याचा कित्ता घेण्यासारखा आहे.


---------------