पान:महाबळेश्वर.djvu/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४६ )


ओळख एकदम न पटल्यामुळे कदाचित् त्याजवर भयंकर प्रसंग गुदरण्याचा संभव असतो. हीं जनावरें मोठमोठया रहदारीच्या रस्त्यावर सहसा येऊन पडत नाहींत, परंतु लांब लांब ठिकाणीं जंगलांतून पाईंटांचें पायरस्ते, घोडयावरून जाण्याचे रस्ते व लहान गाडी रस्ते, यांवर पडणें यांस निर्धास्त वाटतें. सर्वांत फुरशाचा प्रताप जास्त आहे. तीं दरसाल दहापांच बळी घेतल्यावांचून सोडीत नाहींत.

 हीं दंश करणारीं जनावरें, अंधार पडल्यावर आपण बाहेर फिरावयास गेल्यास, केव्हां केव्हां तरी भेटल्याशिवाय रहावयाचीं नाहींत. ज्यांना त्यांचें सप्रेम भेटणें नको असेल त्यांनीं जिकड़े तिकडे स्वच्छ उजेड पडल्यावर बाहेर निघालें पाहिजे. तात्पर्य, महाबळेश्र्वरीं सकाळीं सहापूर्वीं एकटया दुकटयानें बाहेर पडणे व संध्याकाळीं साताचे पुढे अनवाणी व बरोबर दिवा घेतल्याशिवाय बाहेर जाणें फार धाडसाचें काम आहे. विशेषेंकरून अंधाऱ्या रात्रीं अशा रीतीनें बाहेर पडणें किंवा बाहेर राहणें फारच वेडेपणाचें आहे. एकंदरींत पायी जाणाऱ्यांनींं नमून खालीं मान घालून चाललें पाहिजे.