साधारणपणे दिवसा आपण एखाद्या गांवाजवळ आलों ह्मणजे कावळ्याचें कांव कांव ओरडणें व रात्रींचे कुत्र्यांचें भुंंकणें ऐकू येतांच गांव जवळ आलें असें समजतें. परंतु या महाबळेश्वरीं कावळे व कुत्रे असून त्यांचा शब्द पर्जन्य काळांत व हिंवाळ्यांत ऐकूच येत नाहीं; यावरून येथील थंड हवेनें त्यांची पांचावर धारण बसली कीं काय अशी शंका येते. पांखरें नेहमीं देशावर सर्वत्र झाडांवरून दिसतात व तेथें झाडे कमी असल्यामुळे एकेका झाडावर थव्याचे थवे किलकिलाट करीत असतात. याचें कारण त्यांस बसण्यास झाडे पुरत नाहींत असें दिसतें, परंतु येथें त्याचे उलट स्थिति आहे. ह्मणजे झाडे पुष्कळ असून पक्षी फार कमी, असें कां होते ? त्यांस येथें डोंगरावर पिक नसल्यामुळे खाण्यास मिळत नाहीं ह्मणून, किंवा येथें धुकें व पाऊस असह्य ह्मणून कीं काय हें ठरविलें पाहिजे. चिमण्या तर कसल्या त्या येथें मुळींच नाहींत. यावरून या ठिकाणचा हिंवाळा पावसाळा त्यांचे पंचप्राण गोळा करणारा आहे असें वाटतें. परंतु हमेशा डोंगराखालीं