पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 डॉ. कुरियन यांनी गेले वर्षभर खूप प्रचार चालवला आहे की दुधावर प्रक्रिया करणे- त्याचं आईस्क्रीम बनवणे, श्रीखंड बनवणे - अशा तऱ्हेची परवानगी नेस्लेसारखा आंतरराष्ट्रीय कंपन्याना देऊ नये. कारण काय ? त्यांनी असं म्हटलं की, खरा मलिदा, खरी साय, खरं लोणी तर आईस्क्रीम आणि श्रीखंडात आहे, दूध विकण्यात नाही. 'ऑपरेशन फ्लड'वर किंवा आणंदच्या डेअरीवर मुंबईला दूध पुरवण्याची जबाबदारी आहे; त्यांनी दूध पुरवायचं आणि नेस्लेसारख्या कंपन्यानी आईस्क्रीम बनवायचं, हे चुकीचं आहे, अन्याय्य आहे अशी डॉ. कुरियन आरोळी ठोकतात. इकडे सूरतची सुमूल डेअरी हिंदुस्थानामध्ये दुधाला सगळ्यात जास्त भाव देते. म्हशीच्या ६ टक्के स्निग्धांशाच्या दुधाला दर लिटरला ७ रुपये भाव देणारी ही हिंदुस्थानातली एकमेव डेअरी आहे. या सुमूल डेअरीच्या अध्यक्षांना विचारलं की, "तुम्ही इतका भाव कसा काय देऊ शकता?" ते म्हणतात, "आम्ही इतका भाव देऊ शकतो याचं कारण आम्ही आईस्क्रीमबिस्क्रीम बनवण्याच्या फंदात पडत नाही, लोकांना दूध पाजतो आणि त्याच्यातच सगळ्यात जास्त फायदा आहे." हे गूढ काय आहे? एका बाजूला डॉ. कुरियन म्हणतात की प्रक्रिया केल्याने फायदा जास्त मिळतो आणि सुमूलचे अध्यक्ष सांगतात प्रक्रियेच्या फंदात न पडल्यानेच फायदा होतो. याचा खरा अर्थ असा आहे की डॉ. कुरियन काय, महाराष्ट्रातले तात्यासाहेब कोरे काय आणि गावोगावाचे दूध सम्राट काय- या सगळ्यांची दुधावर प्रक्रिया करण्याची कल्पना काय आहे ? सदस्यांकडून शेअर भांडवल गोळा करणे, त्या शेअर भांडवलाच्या आधाराने सरकारकडून आणखी पैसे मिळविणे, ते पैसे नेऊन एखाद्या कंपनीसमोर ठेवणे. त्यांच्याकडे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तयार झालेली किंवा त्या पद्धतीची जी काही यंत्रसामग्री असेल ती यंत्रसामग्री विकत घेणे. त्याच्याकरिता कोट्यवधी रुपये देणे आणि ती कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री येऊन पडली की त्याला एक मॅनेजिंग डायरेक्टर, इंजिनिअर्सची फलटण लागते. त्यांचे पगार ठराविक असतात, कामगारांना पगार द्यावा लागतो, मध्यभागी कारखान्याची एक इमारत बांधावी लागते. त्यात संचालकांचं एक चांगलं ऑफिस ठेवावं लागतं, त्याभोवती गुलाबाच्या चांगल्या बागा फुलवाव्या लागतात, नारळही वाढवावे लागतात आणि इतका सगळा खर्च झाला म्हणजे ऊस पिकवणाऱ्या आणि दूध तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती धत्तुरासुद्धा येत नाही. प्रक्रियेची ही कल्पना शेतकरी संघटनेच्या या प्रयोगामध्ये त्याज्य ठरवलेली आहे. हिंदुस्थानात अशा

बळिचे राज्य येणार आहे / ४२