पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुषांचा पराभव घोडेवाल्या पुरुषांनी घोडेस्वार बनून, हातात तलवार घेऊन केला. आता हे युग संपलं आहे आणि आपण पुन्हा शून्याकडे जात आहोत. जेथून सुरुवात व्हायला हवी होती तिथे जातो आहोत. सीताशेती सीताशेती म्हणजे नैसर्गिक शेती नाही, सीताशेती म्हणजे जैविक शेती नाही. आम्ही जो मार्ग काढू तो जुनाट पद्धतीचा असेल असे नाही. कदाचित आज शास्त्रज्ञांना अवगत नसलेली, कॉम्प्युटर नव्हे तर सुपरकॉम्प्युटर वापरणारी शेती आम्ही करू; पण ती आमच्या बुद्धीने आणि आमच्या प्रयोगांनी आम्ही ठरविणार आहोत.
 याच्याकरिता प्रयोगशाळा कुठून आणायच्या? विज्ञानशाळा कुठून आणायच्या? आपल्याकडे विद्यापीठे नाहीत, दहा दहा हजार रुपयांचा फुकट पगार खाऊन बसणारी प्राध्यापक आणि वैज्ञानिक मंडळीही नाहीत. हा प्रयोग आपल्या शेतावर. आपल्या घरामध्ये. आपल्या परसदारामध्ये, दहा बाय दहाच्या लहानशा जमिनीमध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी स्त्रिया करतील. अशी सीताशेतीची कल्पना आहे.
 हा मुद्दा यासाठी मांडला की कुणाही माणसाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना येऊ नये की अरे, फलाणा फलाणा मनुष्य किती दिवस सांगतो आहे की नैसर्गिक शेती करा. फलाणा फलाणा मनुष्य किती दिवस सांगतो आहे की गोमूत्राची आणि गाईच्या शेणाची शेती करा आणि शेतकरी संघटनाही आता तेच सांगायला लागली. असं वाह्यात समाधान या मंडळींना कणभरसुद्धा आणि क्षणभरसुद्धा मिळण्याचं कारण नाही.
 'माजघर शेती' म्हणजे कारखानदारी नाही

 'माजघर शेती' म्हणजे प्रक्रियेची शेती. या बाबतीतही असाच प्रकार आहे. ही मंडळी फार शहाणी होती म्हणून त्यांनी सारखेचे कारखाने काढले, ही मंडळी फार शहाणी होती म्हणून त्यांनी सुताच्या गिरण्या काढल्या आणि आम्हाला इतके दिवस अक्कल नव्हती म्हणून आम्ही रस्त्यावर जात होतो आणि आता यांचा शहाणपणा पटला म्हणून आम्ही पुन्हा साखरेच्या कारखान्यांकडे व सुताच्या गिरण्यांकडे जातो आहोत असं नाही. 'माजघर शेती' ही कल्पना शेतीच्या प्रक्रियांसंबंधी आजपर्यत मांडल्या गेलेल्या सगळ्याच कल्पनांचा उच्छेद करणारी आहे. त्यातली एकही कल्पना मान्य न करणारी आहे. यावर अनेक प्रकारच्या टीकाटिप्पण्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या प्रक्रियाकल्पनांचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे.

बळिचे राज्य येणार आहे / ४१