पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होत नाहीत, कृपा करून पट्ट्या सोडू नका, आमची पिढी अशीच जाऊ द्या .
 आपल्यावर थोडीशी अशीच वेळ येणार आहे. जन्मतः पायाला पट्ट्या बांधलेल्या आमच्या पायातून रक्त खेळायची आम्हाला सवय नाही आणि या पट्ट्या काढतात म्हटल्यावर एकदा त्या पायातून रक्त धावायला लागल्यानंतर त्याच्या वेदना आम्हाला सहन होऊ शकणार आहेत किंवा नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 इतके दिवस त्या मानाने बरे होतो. शेती आपण करत होतो, सरळसोट. नांगराला बैल जुंपलेले तसे शेतीला शेतकरी जुंपलेला. नांगर दिलेल्या तासाने घेऊन जाण्याचं काम बैलाचं आणि कुणबी जन्मलो म्हणून कुणब्यासारखं शेती करत राहायचं काम आमचं शेतकऱ्याचं! दुःख होत होतं, चांगलं जगता येत नव्हतं, माणूस म्हणून जगता येत नव्हतं, आमची घरची बायापोरं जनावरासारखी जगत, वाढत होती. कुटुंब म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हतं, मग त्यामुळं जे काय समाधान कमी पडत असेल ते गावातल्या वादावादीमध्ये, गावातल्या भांडणांमध्ये एकमेकांची डोकी फोडून विनाकारण गुर्मीमध्ये फिरून थोडं फार मिळवत होतो. पण आता पुढं ठाकलेलं आयुष्य किती आहे! पूर्वीच्या काळी कमी पडलं तर माझ्यासारखा एखादा पुढारी आला आणि सांगू लागला, 'शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे, चला' की गाडीला भोंगे बांधले आणि 'चलो शेगाव' म्हणत चालले!

 स्वातंत्र्य उपभोगणे इतकं सोप नाही. उलट, गुलामीची एकदा सवय पडली म्हणजे फार सोयीची असते. तुम्हाला काय कुणी गुलाबांच्या वाटेवरून चालायला बाहेर नाही काढलेलं? तुम्हाला माणूस म्हणून जगायचा फक्त अधिकार दिला आहे. शेतकरी संघटनेच्या प्रतिज्ञेने इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने तुम्हाला जगता येईल असं म्हटलं. माणूस म्हणून जगायचा हा मार्ग तुम्हाला न कळता खुला झालेला आहे. सुख मिळविण्याच्या प्रयत्नांना आता कुणी अटकाव करणार नाही. १९४२ सालच्या लढाईने कधी वाटलं होतं की आता स्वातंत्र्य मिळेल ? झालंच काय ४२ सालच्या आंदोलनात ? खरे आकडे पाहिले तर पाचपंचवीस माणसं गेली. ब्रिटिश सत्तेला त्यामुळे ढिम्मसुद्धा धक्का लागला नव्हता; पण दुसऱ्या महायुद्धाच्या ज्वाला सगळीकडे पसरल्या आणि त्यामध्ये इंग्लंड असा काही पोळून निघाला की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा मार्ग आपल्याला नकळत मोकळा झाला. तसं दहा वर्ष आपण टक्कर दिली तरी शेतकऱ्याचा स्वातंत्र्याचा मार्ग इतक्यात खुला होईल असं वाटत नव्हतं; पण

बळिचे राज्य येणार आहे / ३८