जागतिक परिस्थिती अशी बदलली की आपल्या शत्रूच्या हातातील शस्त्रं गळून पडली आहेत, तात्पुरती तरी गळून पडली आहेत. याच्यापुढे जायचा मार्ग तुम्हाला शोधून काढायचा आहे.
सीताशेती म्हणजे बुद्धीवर आधारित प्रयोग
शेती कशी करावी? सीताशेती म्हणजे आहे तरी काय? सीताशेती, माजघर शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती- या चतुरंग शेतीमध्ये आजपर्यंतच्या दुढ्ढाचार्यानी मांडलेल्या प्रत्येक कल्पनेचा निषेध आहे, अधिक्षेप आहे. कुणी आम्हाला सांगितलं वरखतं वापरा, युरिया वापरा, अमुक डोस वापरा, तमुक डोस वापरा! आता आम्ही म्हणतो आहोत की शेतीमालाची किमत सरकार पाडू शकत नाही ठरवू शकत नाही आणि देऊही शकत नाही; आम्हीच आमच्या पायावर उभं राहायचं आहे; सरकार संपलं आहे तेव्हा आता आम्ही गुलामीत जन्मलो नसतो तर शेती जशी केली असती तशी शेती करायची ठरवणार आहोत.
सीताशेती म्हणजे नैसर्गिक शेती नाही. सीताशेती म्हणजे जैविक शेती नाही. फक्त गाईचंच शेण वापरायचं, गोमूत्रच वापरायचं असली अजागळ कल्पना मांडणारी ही सीताशेती नाही. खऱ्या अर्थाने शेती ही विज्ञानावर, बुद्धीवर आणि व्यापारावर आधारित करण्याचा पहिला प्रयोग जगामध्ये आज इथं सीताशेतीच्या रूपाने चालू होत आहे. आम्हाला शक्य नव्हतं म्हणून आम्ही शेणखत वापरलं. मग विज्ञान आलं आणि कुणी सांगायला लागलं युरिया वापरा, कुणी सांगायला लागलं फॉस्फेटचे डोस द्या, कुणी म्हटलं एन्डोसल्फान मारा, तेरा फवारे मारा, चौदा फवारे मारा. कुणी आणि कुणी तरी सांगितलं म्हणून आम्ही तसं केलं.
आता परिस्थिती बदलली आहे. जन्मांधाला डोळे आले आणि आम्ही आता सरळ प्रश्न विचारायला लागलो आहोत की जर का आम्हाला ही शेती करायची असेल आणि जर का आम्हाला भाव बांधून देणारं कुणी राहिलं नसेल आणि भाव पाडणारंही कुणी राहिलं नसेल तर माणूस म्हणून आम्ही शेती कशी काय करायची आहे? पहिली गोष्ट, सगळा वाह्यात खर्च बंद . शक्यतो, बाहेरून काही आणायचंच नाही. सीताशेतीचा पहिला पाया शून्य शेती. बाहेरून काही न आणता काही करता येतं की नाही? अगदीच काही लागणार असेल तर बघू. पण अशीच शेती करणं आपल्याला भाग पडणार आहे. सध्याची जी हरितक्रांतीची शेती आहे त्याला पर्याय शोधावाच लागणार आहे.