पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कधी येऊन जातात ते समजतसुद्धा नाही. मोठा आवाज करून, धूमधडाक्याने एखादा बदल घडला तर समजा हा बदल फालतू आहे. इंदिरा गांधींच्या जागी राजीव गांधी आले, वर्तमानपत्रात खूप आवाज झाला, याचा अर्थ काही हा खरा मोठा बदल नाही. एखाद्या देशात क्रांती झाली म्हणजे काय? लोकांना लुटणारं एक सरकार जाऊन लोकांना लुटणारं दुसरं सरकार आलं म्हणजे फार मोठी क्रांती झाली की काय ? गोरा इंग्रज गेला, लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा लागला, नवीन पंतप्रधान सफेद अचकनीतले गुलाब लावणारे झाले, गोऱ्या इंग्रजाच्या जागी काळा इंग्रज आला ही काही क्रांती झाली नाही; पण वर्तमानपत्रात ज्याचा आवाज होतो तो मोठा बदल झाला असं आजकाल सगळ्यांना वाटतं. एखाद्या राज्याचा एक मुख्यमंत्री जाऊन दुसरा मुख्यमंत्री झाला तरी वर्तमानपत्रांची भाषाच अशी बदलते की जणू काही सारं जगच बदललं! खरं म्हटलं तर काही सुद्धा फरक पडलेला नसतो.
 फार महत्त्वाचे बदल असे अलगद येऊन जातात की त्याचा आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही. असा बदल शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे.
 'शेगावच्या जाहीरनाम्या' मधील पहिला मुद्दा हा आहे. ज्या ज्या साधनांनी शेतकऱ्यांना बाधून ठेवलेलं होतं ती साधनं आता सरकारच्या हाती सध्या तरी नाहीत; उद्या परत आली तर बघू निदान, ज्या प्रमाणात त्यांच्याकडं ती साधनं होती त्या प्रमाणात तरी नाहीत. अशा परिस्थितीत पुढचे पाऊल कसे टाकायचे हा खरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
 एक जुन्या नाटकातला प्रसंग आहे. पंतोजी एका श्रीमंत व्यापाऱ्याला गद्य म्हणजे काय हे शिकवायचा प्रयत्न करतात, 'कविता म्हणजे पद्य, कविता नाही ते गद्य.' गद्याचा अर्थ शिकता शिकता तो व्यापारी काय म्हणतो? 'अरे, गद्य म्हणजे आपण नेहमी बोलतो तेच ना?' तसाच हा शेगावचा चतुरंग शेतीचा कार्यक्रम म्हणजे काय आहे? शेतकऱ्याच्या पायात जन्मल्यापासून ज्या बेड्या पडलेल्या असतात त्या तशा न्मल्यापासून नसत्या तर तो जन्मतः जसं वागायला लागला असता त्याची ही रूपरेषा आहे; यात नवीन काही नाही.

 जर का, शेतकऱ्यांना आजपर्यंत या गुलामगिरीचा अनुभव कधी घ्यावा लागला नसता तर त्यांनी काय केलं असतं? शेती कशी केली असती? व्यापार कसा केला असता? प्रक्रिया कशा केल्या असत्या ? निर्यात कशी केली असती? हे आपोआपच जमलं असतं. फक्त आपण जन्मांध जे जन्मलो, आता दृष्टी आल्यानंतर जाणवणाऱ्या या प्रकाशाशी कसं काय वागायचं हे समजत

बळिचे राज्य येणार आहे / ३६