एका काळी मी असं म्हटलं होतं की पाण्याचं वाटप कसं व्हावं याबद्दल माझी काही व्यक्तिगत मतं आहेत; पण त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. गावागावांमध्ये वैद्यकीय व्यवस्था कशी व्हावी यासंबंधीही मी काही बोलू इच्छित नाही. असं का? त्यावेळी मी असं म्हटलं होतं की. "एखाद्या जन्मांधाला जर डोळे आले तर जग कसं दिसेल याचं चित्र त्याला कधी सांगता येणार नाही; ज्याने आयुष्यात कधी प्रकाश पहिलाच नाही तो मनुष्य त्याला दृष्टी आली आणि प्रकाश दिसू लागला तर जग कसं दिसू लागेल याचं वर्णन काय करणार? आणि आपण त्याच्यासमोर जगाचं कितीही वर्णन केलं तर त्याला त्यात काय समजणार? तसंच पिढ्यानपिढ्या शेती तोट्यात चालवणारा शेतकरी हा माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र जर मिळालं तर कसं काय जगेल याचे आराखडे आता बनवायला लागू नका. शेतकऱ्याला लुटणाऱ्या माणसांनी विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये शेती कशी करावी याचे आराखडे बनविण्याचे काही कारण नाही. ज्यावेळी शेतकरी माणूस बनेल आणि स्वतंत्र बनेल. तेव्हा तुमच्या कल्पनेमध्येसुद्धा येणार नाही असे अप्रतिम मार्ग - शेती करण्याचे, प्रक्रिया करण्याचे, व्यापार करण्याचे, निर्यात करण्याचे तो - दाखवून देईल.'
काही लोकांना खूप आनंद वाटायला लागला आहे. ते म्हणू लागले की शेतकरी संघटना आता रुळावर आली आहे. इतके दिवस जे आम्ही म्हणत होतो तेच आता शेतकरी संघटना म्हणू लागली आहे. असं म्हणण्यात त्यांना खूप आनंद होऊ लागला आहे. अनेक थोर-थोर नेत्यांची मला पत्रं येऊन राहिलीत की शेतकरी संघटनेने आता विचार अधिक व्यापक करायला सुरुवात केली या गोष्टींनी त्यांना फार आनंद झाला आहे. म्हणजे 'आम्ही फार शहाणे होतो,तुम्ही इतके दिवस मूर्खासारखे चालला होता, आमच्या रस्त्याला आलात
बरं झालं.' असंच जणू त्यांना म्हणायचं आहे!
शेतकरी संघटनेच्या शेगावच्या जाहीरनाम्याचे दिलेल्या भारत दशकातील चतुरंग शेतीच्या कार्यक्रमाबाबत अशी काही गैरसमजूत निदान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची होऊ नये आणि झाली असल्यास ती दुरुस्त व्हावी.
एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. रात्र संपते आणि दिवस उगवतो. काळीकुट्ट अंधारी रात्र नेमकी संपली कधी आणि पहाटेची सुरुवात झाली कधी याची जर कुणाला रेषा निश्चित करायला सांगितली तर ते करणे अशक्य आहे. जगामधील सगळे महत्त्वाचे बदल हे असे अलगद पावलांनी येऊन जातात,