पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/278

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही मुळी विक्रीची वस्तूच मानली जात नव्हती. त्या वस्तूचा किती का कमी होईना काहीतरी भाव मिळतो आहे याचाच आनंदोत्सव झाला. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरच्या अपुऱ्या आणि असंतुलित आहाराला थोडीफार दुधाची जोड होती. आता हे दूध शेतकऱ्याच्या घरातून काढून शहरातल्या ग्राहकाकडे पोचवायचे होते. सुरुवाती सुरुवातीला गावातील दूध शहरात गेले ते शहरातल्या दुधाच्या गरजा भागवण्याकरता. शहरांचे वैभव जसजसे वाढत गेले तसतसे हे दूध श्रीखंड, चीज, आईसक्रीम, लोणी, तूप अशा वस्तू बनवण्याकरिता जाऊ लागले. अहमदाबाद, दिल्ली, मुंबईसारख्या शहरांत आईस्क्रिम हा लोकांचा नवा छंद झाला आहे. चाळीस वर्षापूर्वी देशात जवळजवळ माहित नसलेले चीजचे वेगवेगळे प्रकार पाश्चात्य देशांशी परिचित असलेल्या लोकांच्या आवडी पुरवण्याकरिता तयार होताहेत. ज्यांच्या घरी दूर तयार होते त्या शेतकऱ्यांकडे कदाचित स्वातंत्र्यानंतर कपभर चहा घेण्याची शक्यता तयार झाली असेलही; पण ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या आहाराचा आधार तुटला यात काही शंका नाही. किंबहुना गावातील लोकांच्या हातून दूध काढून घेणे, त्याचे त्यांना पैसे देणे व त्या पैशातून त्यांनी डाळी व इतर स्वस्त प्रथिनांचा वापर करणे यातच त्यांचे कल्याण आहे असे अगदी उघडपणे डॉ. कुरियनसारखे दूधमहर्षी प्रतिपादतात.
 दूधाचे संकलन आणि वाटप करण्याच्या या योजनेत एक फार मोठी गोम होती. असलेल्या जनावरांचे दूध जुन्या काहातील पडत्या किंमतींना विकण्यास उत्पादकांना काही फारसा त्रास वाटला नाही. दुधाला काही उत्पादन खर्च असतो आणि तो उत्पादन खर्च भरून येण्याइतकी किंमत मिळाली पाहिजे असा विचार लोकांच्या मनाला शिवतही नसे. गाय, म्हैस ही हौसेपोटी किंवा भावनेपोटी नाही तर चांगलेचुंगले पोटात जावे यासाठी ठेवायचे. आपले भागल्यावर उरेल ते दूध रतीबाने घालणे हासुद्धा कमीपणाच मानला जायचा. मोठ्या घरी लोणी काढून घेतल्यानंतर ताक फुकट वाटायचे हेच खानदानीपणाचे लक्षण मानले जाई; पण घरचे पुरून उरलेल्या दुधाची अशीतशी वासलात लावणे ही गोष्ट वेगळी आणि नियमितपणे व्यवसाय म्हणून दूध पुरवणे ही गोष्ट वेगळी.

 घरच्या गायीला काही खास गोठा लागे असे नाही. गृहलक्ष्मी हौसेने गायीचे सगळे काही करी; पण नवीन गायी घ्यायच्या, त्यांची उस्तवार काढायची, माणसं नेमायची आणि बाहेरून विकत घेऊन त्यांना खाऊ घालायचे

बळिचे राज्य येणार आहे / २८०