पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/250

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळकत होते आहे, आपण अधिकच गाळात जात आहोत.' तेव्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानामध्ये शेतकरी आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहू लागले. हे नवीन आंदोलन सुरू करण्याचे श्रेय कोणाला द्यायचे झालेच तर ते तामिळनाडूच्या नारायणस्वामी नायडूंना द्यावे लागेल; आजसुद्धा मी त्यांना माझे गुरू मानतो. महाराष्ट्रात कोणाला देणार ? नानांनी 'भूमिसेवक' सुरू केले त्याच वेळी नागपूरच्या शरद पाटलांनी 'अन्नदाता' सुरू केले होते. आम्हीदेखील काही प्रयत्न करीत होतो. त्यापैकी कोणाच्या गळ्यात श्रेयाची माळ टाकावी या वादात काही अर्थ नाही. पुढे जाणाऱ्यांमध्ये कोणी पुढे जाण्याला आधी सुरुवात केली याबद्दल वाद असत नाही, पुढे जाणाऱ्यांमध्ये वाद निर्माण करू पाहणाऱ्या कुंठितांच्याच मनात असले प्रश्न तयार होतात.
 मी आता नानांच्या वयाचा नसलो तरी सत्तरीच्या वर आलो आहे आणि मलाही आता नदीच्या पलीकडील दृश्ये दिसू लागली आहेत. तारुण्याच्या भरात पटले नव्हते पण मला आता वाटू लागले आहे की आपण प्रयत्न करतो हा एक भाग असतो, त्याला यश किती मिळावे हे ठरवणारी शक्ती वेगळी असते. नानांचा जन्म मराठवाड्यात अंबाजोगाईला शेतकऱ्याच्या घरात झाला, त्याऐवजी माझ्याप्रमाणेच मध्यमवर्गीय सुशिक्षित घरात झाला असता तर त्यांनाही माझ्यासारखा परिस्थितीचा फायदा मिळाला असता. मी मध्यमवर्गीय घरात जन्मल्यामुळे मला शिक्षणाची चांगली संधी मिळाली, मी परदेशात गेलो आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी एकाच वेळी शेतकऱ्यांशी आणि पत्रकार, बुद्धिवादी यांच्याशीही संवाद साधू शकतो म्हणून माझे नाव पुढे राहिले; इतर कमतरता असूनही पुढे राहिले. संघटक म्हणून गुण द्यायचे झाले तर नानांना माझ्यापेक्षा दसपट गुण द्यावे लागतील. इतका त्यांचा जनसंपर्क आहे.

 श्रीरंगनानांच्या अमृतमहोत्सव सत्काराच्या निमित्ताने सगळे लोक पुन्हा एकदा एकत्र आले. या निमित्ताने तुम्हा सर्वांना काय सांगावे? नानांच्या काळात शिबिर झाले आणि त्यावर आधारित, तुम्ही ज्याला शेतकऱ्यांची गीता म्हणता असे 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' हे पुस्तक तयार झाले; पण तो काळ आता संपत आला आहे. हे विसरू नका. कोणत्याही धर्माचा कितीही पवित्र ग्रंथ असो - बायबल असो, कुराण असो वा भगवद्गीता असो जो असे धरून चालतो की हा ग्रंथ म्हणजे अखेरचा शब्द आहे, त्यापलीकडे काही नाही त्याचा विनाश जवळ आला आहे असे धरावे. ज्यांना

बळिचे राज्य येणार आहे / २५२