पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/251

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे वाटते की, 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकात जे लिहिले आहे ते आपल्याला सगळे समजले आहे आणि त्याच्या आधारे आपण आता शेतकऱ्यांसमोर बोलू शकतो आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ८० सालच्या गीतेतले शब्द आपण बोलतो आहोत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या टाळ्या आपल्याला पडणार आहेत आणि आपले कौतुक होणार आहे.' त्यांना मी एक धोक्याचा इशारा देऊ इच्छितो. 'काळ बदलला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न बदलले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर त्याच त्याच ऐंशी सालच्या घोषणा आणि भाषणे करू लागलात तर १९८० मध्ये शरद पवार जितके हास्यास्पद झाले तितकेच हास्यास्पद तुम्हीही झाल्याखेरीज राहणार नाही, हे निश्चित. काळ बदलला आहे आणि जोपर्यंत तुम्ही नवीन शेतीची भाषा, नवीन शेतीचे व्याकरण, नवीन शेतीचा शब्दकोश शिकत नाही, वाचत नाही, त्याच्या मदतीने शेतीच्या परिस्थितीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या पुढारीपणाचा आव आणला तर येत्या काळात तुमच्याकडून शेतकऱ्यांचा घात होणार आहे. बदलत्या शेतीचा अभ्यास करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देणे भलत्यासलत्याला पेलणारे धनुष्य नाही.

 आपण १९८० मध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा जागतिक हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ हे शब्दसुद्धा कोणी ऐकले नव्हते. पंचवीस वर्षांनी महाराष्ट्रातील तापमान ४८ ते ५० अंशांपर्यंत चढेल आणि त्यामुळे आपली नेहमीची पिके घेता येणे शक्य होणार नाही हे १९८० साली आपल्याला माहीत नव्हते. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे असे म्हणताना त्या काळी गणकयंत्राचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते; गणकयंत्राच्या साहाय्याने वायदेबाजारात उतरून आपल्या मालाची रास्त किमत घरबसल्या मिळवणेही त्या काळी शक्य नव्हते. शेतकऱ्यांविषयी मनात द्वेष बाळगणारे सरकार त्या वेळी होते आणि आजही आहे. पण, शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची त्याची हत्यारे आता बदलली आहेत. आता कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकरीविरोधी कारस्थाने चालत नाहीत. आता नवीन परिस्थितीत सरकार वायदेबाजारावरच बंदी घालून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा भाव मिळू नये अशी तरतूद करते. शेतात पिकणाऱ्या सगळ्या हिरवळीतून शेतकरी इथेनॉलच्या म्हणजे 'शेततेला'च्या रूपातील इंधन तयार करू शकतो पण तसे स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळू नये असे धोरण आखते. शेतकऱ्याला लुटण्याची सरकारची ही नवीन साधने आहेत. या संबंधात ज्यांचा अभ्यास आहे, या

बळिचे राज्य येणार आहे / २५३