पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/237

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकऱ्यांच्या बंडाचे वादळ घोंगावते आहे



 शेतकऱ्यांच्या असंतोषाचे ढग गोळा होऊ लागले आहेत आणि लवकरच ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि अनेक वर्षे ते सोसत आलेला जुलूम त्यात वाहून जाणार आहेत. ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या या अपरिहार्य बंडाची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
 जेव्हा सर्व लोक २००८ सालाचे स्वागत करीत होते त्यावेळी देशभरातील लाखभर शेतकरी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा डाग अंगावर बाळगत अस्त पावणाऱ्या २००७ या घातवर्षाला अखेरचा निरोप देत होते. प्रतीकात्मक निरोप म्हणून त्यांनी आपली कर्जासंबंधी कागदपत्रे समुद्रात बुडवली आणि २००८ सालाचे स्वागत करताना नववर्षाच्या अखेरपर्यंत वर्षानुवर्षांच्या आपल्या कर्जबाजारीपणाचा अंत करण्याची प्रतिज्ञा केली. शेतकऱ्यांना आता मनोमन पटले आहे की त्यांच्यावरील कर्जे ही अनैतिक आणि बेकायदेशीरही आहेत; स्वातंत्र्योत्तर काळातील इंडिया सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळेच त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला आहे.
 ३१ डिसेंबर २००७ रोजी देशातील शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशभरातील शेतकरी स्त्री-पुरुष, अरबी समुद्र हिंदी महासागराला जेथे मिळतो, श्रीरामाने रावणावरील चढाई ज्या धनुष्कोडीपासून सुरू केली तेथून जवळच असलेल्या रामेश्वर येथे गोळा झाले आणि त्यांनी आपल्या कर्जासंबंधीचे कागदपत्र समुद्रात बुडविले आणि देशभरातील शेतकरी कर्जमुक्त झाल्याचे घोषित केले.

 रामेश्वर येथे जमा झालेले शेतकरी, अनैतिक व बेकायदेशीर कर्जाविरुद्ध गेली पंचवीस वर्षे चाललेल्या लढ्यात सतत पराभव पत्करावा लागल्याने, हवालदिल झाले होते. पाव शतक त्यांनी त्यांच्याविरुद्ध केला जाणारा पक्षपात आणि त्यामुळे

बळिचे राज्य येणार आहे / २३९