पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनात एक घबराट तयार होणार आणि चांगली पिकतीफळती शेतीची जमीन मिळेल त्या किमतीत विकून टाकायची त्यांची तयारी होणार. अशा तऱ्हेने शेती बंद झाल्याने मोकळी पडलेली जमीन मोठ्या प्रमाणावर आपण ताब्यात घेऊ शकू आणि आता आहे त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात, प्रत्येक जिल्ह्यात हजारो एकर जमीन आपल्या सहकाऱ्यांच्या मालकीची झाली किंवा त्यांच्या ताब्यात आली म्हणजे मग दिल्लीला राज्य कोण करतो आणि मुंबईला राज्य कोण करतो याला महत्त्व न राहता ही जमीनदारी कोणाकडे आहे यावरच शेवटी राजकारणाचे रंग ठरू लागतील.
 'शेती सोडा' हे सांगण्यात साहेबांचा हेतू काय होता हे सांगणे खरोखर कठीण आहे. शेतकरी हा वाडवडिलार्जित जमीन मिळाल्यामुळे जबरदस्तीने शेतकरी झाला आहे. शेती परवडत नाही, कर्जबाजारीपणा येतो आणि त्यातून प्राण देण्याची वेळ येते. त्यामुळे, त्याला या शेतीच्या पाशातून सोडविल्यास आणि ज्या इतर कोणाला, जे शेतकरी घरात जन्मलेले नाहीत पण ज्यांना शेती करण्याची हौस आहे, आवड आहे, ज्यांच्या ठायी व्यवस्थापनाचे कौशल्य आहे, आजच्या शेतीच्या तंत्रज्ञानाची मोठी जाणकारी आहे आणि आवश्यक तेवढा भांडवलाचा पुरवठाही आहे अशी मंडळी शेतीत आल्यास हिंदुस्थानातील शेतकऱ्याची 'फाटके धोतर नेसलेला, कंगाल, निरक्षर, आजारी' अशी प्रतिमा न राहता आधुनिक शेतकरी हिंदुस्थानातील शेती राबवू शकेल हा भाग वेगळा; परंतु शेतकऱ्यांना 'शेती सोडा' असा सल्ला देताना अशी कल्पना साहेबांच्या मनात असेल असे काही दिसत नाही. तसे असते तर ते त्यांनी स्पष्टपणे सांगितले असते. त्यांच्या मांडणीमध्ये कोणती स्पष्टता असण्यापेक्षा गोंधळ अधिक आहे. त्यातून निष्पन्न काय व्हायचे ते होवो. एवढे मात्र नक्की की, सध्या विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि जमीन संपादनाच्या कचाट्यात आधीच सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक मोठी जखम होईल आणि त्या जखमेमुळे साहेबांच्या सहकाऱ्यांना जमिनी घशात घालणे अधिक सोपे होईल.

(शेतकरी संघटक, २१ ऑगस्ट २००७)

बळिचे राज्य येणार आहे / २३८