पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/234

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काळ चालू शकेल याबद्दलही शंका निर्माण झाली आहे. कदाचित, काही दशकांत अन्नधान्याचे उत्पादन हे केवळ मध्यम उष्णतामानाच्या प्रदेशात किंवा त्याहीपेक्षा सैबेरियासारख्या थंड प्रदेशातच होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये, हिंदुस्थानातील शेतकऱ्यांना वाढत्या उष्णतामानाच्या संकटाला तोंड देण्याकरिता लागणारी वैज्ञानिक तयारी येथील शेतीशास्त्रज्ञ करू शकतील अशी काही लक्षणे दिसत नाहीत. 'अन्नधान्यावर प्रक्रिया होत नाही, होत नाही; प्रक्रिया झाली पाहिजे, शेतीउद्योग वाढले पाहिजेत' असे म्हणता म्हणता अर्धे शतक उलटले आणि वेळ अशी आली की, शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची साठवणूक करण्याकरिता जे काही शीतकरणाचे तंत्रज्ञान आजपर्यंत उपलब्ध होते तेही आता कालबाह्य होऊ लागले आहे. यापुढे शेती व्हावी कशी? दुधाची क्रांती संकरित गाईंच्या आधाराने झाली आणि त्यामुळे मणिभाईंसारख्यांची खूप हवाही झाली; पण या संकरित गाई दोनचार अंशांनी उष्णतामान वाढले तरी टिकून राहत नाहीत; त्यांचे दुग्धोत्पादन थंडावते. अशा परिस्थितीत, जगाच्या वाढत्या उष्णतामानामुळे, दुधाच्या क्रांतीलाही मोठा अडथळा येणार आहे. तेव्हा आता शेतकऱ्यांनी करावे कसे याचे उत्तरही सरकारकडे नाही. त्यामुळे, हे उत्तर सापडेपर्यंत शेतकऱ्यांनी शेती सोडावी हे जास्त चांगले असाही सुज्ञपणाचा विचार साहेबांना सुचला असावा.
 'शेतकऱ्यांनो, शेती सोडा' असे सांगताना शेतकी मंत्रालय बंद करा असे साहेबांनी सांगितले नाही. तसेच, आता शेतीशी संबंधित सहकारी संस्थाही बंद करा, सहकारी बँकाही बंद करा असाही सल्ला साहेबांनी दिलेला नाही. त्यातही एक मोठे धोरण आहे. शेतीत जरी काही निघत नसले तरीसुद्धा सहकाराच्या धंद्यामध्ये उदंड काही मिळते आणि त्यातूनच पुढाऱ्यांची पैदास होते हे साहेबांना चांगले ठाऊक आहे आणि सहकाराचे क्षेत्र जर कमजोर झाले तर मग आपल्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान राहणार नाही आणि आपल्यालाही सबंध देशात काही स्थान राहणार नाही याचीही साहेबांना चांगल्यापैकी जाणीव आहे. त्यामुळे साहजिकच एका बाजूला 'शेती सोडा' असा सल्ला शेतकऱ्यांना देताना सहकाराच्या पुनर्बाधणीकरिता आणि मजबुतीकरिता हजारो कोटी रुपयांची दौलत, दिल्ली खजिना लुटून, साहेब महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये सहकारी संस्थांच्या मदतीकरिता वाहून आणत आहेत.

 शेती सोडा आणि करा काय याचा सल्ला मात्र साहेबांनी अजून नेमका दिलेला नाही. त्यांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने मोठा गाजावाजा

बळिचे राज्य येणार आहे / २३६