पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एवढ्याने जमले नाही, कारण दुधाला भाव नाही, तर मग शेतकऱ्यांनी कोंबड्या पाळाव्या असे सांगून झाले. गाईम्हशी पाळून, कोंबड्या पाळूनही जमले नाही तर बकऱ्या पाळा, डुकरे पाळा, शेवटी फळबागा करा असे सगळे काही सांगून झाले; पण शेतकऱ्याचा मुख्य धंदा आणि देशाची सर्वात मोठी गरज म्हणजे अन्नधान्य उत्पादन करणे, ते करून शेतकरी जगू का शकत नाही याचा उलगडामात्र त्यांनी कधी केला नाही.
 शेतकऱ्यांनी शेती सोडावी या सल्ल्यामागे आणखी एक धोरण असू शकते. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा, परदेशातून आयात फारशी करू नये, शक्यतो निर्यातही करू नये अशा तऱ्हेचे धोरण नेहरूंच्या समाजवादी काळात राबवण्यात आले. त्यामुळे, देश अधिकाधिक गरिबीतच बुडत गेला. याउलट, आपल्या कर्तृत्वाला इथे काही वाव नाही हे पाहून देश सोडून परदेशात गेलेल्या भारतीयांनी त्यांच्या कर्तृत्वाने, धडाडीने आणि ज्ञानाच्या ताकदीवर सगळ्या जगात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर, ते हिंदुस्थानच्या आर्थिक विकासाचे प्रमुख साधन बनले. हे लक्षात घेता, देशात राहून देशाचे भले होण्यापेक्षा देशाच्या बाहेर जाऊन देशाचे जास्त भले होऊ शकते असा सर्वांचाच अनुभव आहे. त्याच उदाहराणाप्रमाणे शेतकऱ्यांनी शेती सोडल्यास, कदाचित, शेतीचे जास्त भले होण्याची शक्यता आहे अशी पवारसाहेबांच्या मनातील कल्पना असू शकते. या कल्पनेमागेही काही तथ्य आहे.
 हिंदुस्थानातील जवळजवळ सर्वच शेतकरी हे केवळ त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या डोक्यावर जमीन सोडली म्हणून बळजबरीने शेती कशीबशी ओढत आयुष्य कंठतात. दिवसेंदिवस शेतीचे स्वरूप बदलत गेले. घरचे बियाणे, घरची खतेमुते, घरची औषधे, गावातीलच औजारे हे संपून बाहेरची विकत घेतलेली बियाणी, विकत घेतलेली रासायनिक खते व औषधे, कारखानदारीतील यंत्रे यांची शेती आली. केवळ स्वावलंबनी शेती न राहता हिंदुस्थानच्या जनतेला अन्नधान्य, जळण यांचा पुरवठा व्हावा याकरिता शेती होऊ लागली आणि तरीदेखील, शेतकरी तोच राहिला.

 आता नवीन जैविक बियाणी आली आहेत. केवळ देशाकरिता शेती करायची नाही तर जगामध्ये ज्या ज्या मालाचे उत्पादन आपला देश अधिक किफायतशीरपणे करू शकतो त्या त्या मालाचे उत्पादन करण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. त्याचबरोबर, जागतिक उष्णतामानाच्या वाढीमुळे हिंदुस्थानसारख्या उष्ण कटिबंधातील देशामध्ये अन्नधान्याचे उत्पादन किती

बळिचे राज्य येणार आहे / २३५