पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/235

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करीत सर्वत्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चालू केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आता यापुढे रोजगार हमीच्या कामावर जावे असे त्यांच्या मनात असले तरी तसे साहेबांनी बोलून दाखविलेले नाही. यापलीकडे, संपुआ सरकारचा 'भारत निर्माण'चा जो काही व्यापक आणि भव्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे काय होणार, शेतकऱ्यांनी शेती सोडली तर 'भारत निर्माण' कोणाकरिता करायचा याचाही खुलासा साहेबांच्या वचनात कोठेही येत नाही.
 शेतकऱ्यांनी काय करावे हे सांगितले नाही, त्यापेक्षा 'शेती सोडा' हे सांगणे सोपे आहे; पण शेती बंद पडली किंवा बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेती पिकविण्याचे बंद केले, विशेषत: अन्नधान्याच्या शेतकऱ्यांनी शेती पिकविणे बंद केले तर मग आम नागरिकांनी खायचे काय, ल्यायचे काय, चुलीत जाळायचे काय याचे उत्तर साहेबांनी द्यायचे टाळले आहे. त्याचे कारणही समजण्यासारखे आहे. कारण असो किंवा नसो, ग्राहकांच्या सोयीसाठी आयात करणे सरकारचे कर्तव्य आहे हे साहेबांनी अनेकवेळा निक्षून जाहीर केलेले आहे. तेव्हा, अन्नधान्याची आयाततर आपण करतोच आहोत; त्यापलीकडे, दुधाची, कापसाची, फळफळावळीची सगळ्यासगळ्याची आयात करणे काही अशक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये, हरित क्रांतीच्या आधी, अशोक मेहता यांनी अमेरिकेला भेट देऊन सगळ्या जगामध्ये अन्नधान्य किती स्वस्त आणि मुबलक उपलब्ध आहे हे पाहून हिंदुस्थानला आपल्या शेतीकडे काही काळ सद्बुद्धीने दुर्लक्ष (Benign neglect) केल्यास चालण्यासारखे आहे असे त्यांच्या अहवालात म्हटले होते. अशोक मेहतांनंतर साहेब हे दुसरे शहाणे! 'शेती सोडा' हे सांगणे काय आणि अशोक मेहतांच्या शब्दांत (Benign neglect) करा म्हणून सांगणे काय दोघांचा तथ्यांश तोच.

 शेतकऱ्यांना शेतीतून काढण्यात साहेबांचा खरा हेतू काय आहे ? साहेबांच्या आसपासचे त्यांच्या पक्षातील लोक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी जमिनी ताब्यात घेत आहेत हे सर्वश्रुतच आहे. कोणत्या ना कोणत्या नियमाखाली जमिनी अडवायच्या, त्या अडलेल्या जमिनींचे भाव पडले की मग त्या जमिनी विकत घ्यायच्या आणि नंतर आपले सरकारी, राजकीय वजन वापरून त्या अडचणी व अडथळे दूर करून आपल्या जमिनींची किमत वाढवून घ्यायची हा 'भूखंड' उद्योग काँग्रेसचे लोक आणि, त्यातल्या त्यात साहेबांच्या पक्षाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर केव्हापासून करीत आहेत. आता सगळ्या शेतकऱ्यांना 'शेती सोडा' म्हणून सांगितले म्हणजे साहजिकच शेतकऱ्यांच्या

बळिचे राज्य येणार आहे / २३७