पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गेल्या काही दशकांतच मनुष्यप्राण्याचे संचारसामर्थ्य पराकोटीच्या गतीने वाढले आहे. अरेबियन सुरस कथांतही अद्भुत वाटावे असे जादूचे दिवे व अंगठ्या सर्वसामान्य माणसाच्या हाती आलेल्या आहेत. घरी बसल्याबसल्या जगाच्या दूरवरच्या कोणत्याही कोन्याकोपऱ्यात चाललेले मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा, राजकीय घडामोडी तत्क्षणीच कोणीही पाहू शकतो. गणकयंत्राच्या साहाय्याने जगाला व्यापणारी ज्ञानगंगा सर्वांच्या हाताशी आली आहे. कोणीही जावे, हवी ती माहिती काढून घ्यावी. जगास देण्यासारखे काही ज्ञान आपल्याकडे आहे असे वाटले तर ते इंटरनेटच्या ज्ञानगंगेत सोडून द्यावे असे अद्भुत प्रत्यक्ष डोळ्यासमोर अवतरले आहे. अगदी किरकोळ खर्चाने कोणीही कोठेही बसल्या बसल्या ह्न घरात, मोटारीत, आगगाडीत ह्न जगातील दुसऱ्या कोणत्याही माणसाशी तो कोठेही असला तरी क्षणार्धात सेल्युलर फोनने संपर्क साधू शकतो.
 नवीन संचार आणि माहिती तंत्रज्ञानाने जगातील शेवटल्या उरल्यासुरल्या भौगोलिक व राजकीय भिंती जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. आपल्या प्रकृतीचा समानधर्मी शोधण्यासाठी आता गावकुसाच्या मर्यादा नाहीत, राष्ट्रीय सरहद्दींच्याही नाहीत.
 साहजिकच, अर्थकारण, उत्पादन, व्यापार, शिक्षण आणि संस्कृती या सर्वच क्षेत्रात साऱ्या जगाचे एकीकरण होऊ घातले आहे.

 कोणी देश या स्थितीत स्वत:ला एक वेगळे बेट कल्पून जगापासून काडीमोड घेऊन राहणे अशक्य आहे. माहिती-तंत्रज्ञानातील ही क्रांती पन्नास वर्षे आधी आली असती तर समाजवाद्यांचा लोखंडी पडदा केव्हाच वितळून गेला असता. आता कोणीही विटामातीचे, बांबूचे पडदे उभे करीत त्यामागे आपापल्या संस्कृतीचे डबके राखून ठेवू शकणार नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर जगभर चाललेल्या तंत्रज्ञानाच्या आणि उत्पादनाच्या भरारीपासून तो वंचित राहील आणि पुन्हा एकदा सोमनाथाच्या इतिहासाची पुनरावृत्ती अनुभवावी लागेल. या कालप्रवाहात स्वत:ला झोकून देण्यापलीकडे पर्याय म्हणून राहिलेला नाही. पोहायला उतरल्यानंतर नाकातोंडात पाणी जाणार, जीव घाबरा होणार, प्राण कंठाशी येणार आणि आता सारे संपले आहे असे वाटत असतानाच जिवाच्या आकांताने हातापायांची हालचाल चालू झाली आहे आणि आपण बुडण्याऐवजी तरंगत आहोत आणि हे तरंगणे मोठे आनंददायी आहे याचा अनुभव येतो. प्रवाहापासून बाजूला राहणारांबाबत 'थांबला तो संपला' आणि प्रवाहात उतरणारा

बळिचे राज्य येणार आहे / २१२