पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे' या उक्तींचा अनुभव येणार आहे.
 ७.
 पाण्यात उतरलेला पोहायला शिकतो हे खरे; पण शंभरात एखाददुसरा काही अपघाताने दुर्दैवीही ठरू शकतो. अगदी असंभव वाटणाऱ्या अपघातांनाही तोंड देण्याची सज्जड तयारी करूनच पाण्यात उतरणे सुज्ञपणाचे; पाणी महापुराप्रमाणे घोंघावत आले आणि काही विचारपूस न करता उचलूनच घेऊन गेले तर तयारी करण्याचा प्रश्नच राहत नाही. एरवी, शक्य तितकी तयारी करणे हे शहाणपणाचे. पाण्यात उतरणारा आजारातून उठलेला असला, अशक्त प्रकृतीचा असला तर मग सावधानतेची सर्व काळजी घेणे विशेष अगत्याचे.
 भारतीय शेतकऱ्याची परिस्थिती दीर्घकाळच्या आजारातून उठता उठता महापुराला सामोरे जाणाऱ्या माणसासारखी आहे. गोरा इंग्रज आणि त्यानंतर काळा इंग्रज यांनी केलेल्या शोषणानंतर जमीन नापीक झालेली, तिचे तुकडे तुकडे झालेले, उत्पादन घटलेले, उत्पादकता तर त्याहूनही घसरलेली, शेतीतील भांडवल घसारून गेलेले, नवीन गुंतवणूक फारशी नाही, शेतीत पिकलेल्या मालाच्या साठवणुकीची व्यवस्था नाही, वाहतुकीची नाही, विक्रीची नाही, गावात रस्ता, पाणी, वीज दूरच राहिले, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही असा शेतकरी जागृत होऊन डोळे उघडून पाहतो तर समोर जागतिकीकरणाचा महापूर रोरावत येत असणारा! आणि शेतीव्यवसायाचे युगानुयुगे चालत आलेले स्वरूपच जैविक तंत्रज्ञानातील क्रांतीने उलटेपालटे करून टाकलेले.
 जागतिकीकरणाचा मूळ पाया हा 'क्षमतेनुसार श्रमविभागणी' हा आहे. भारतीय शेतकऱ्याला भरपूर सूर्यप्रकाश, उदंड पाणी आणि कष्टाळू हात यांची मोठी देणगी लाभलेली आहे. जगातील कोणत्याही शेतकऱ्यापुढे अंततोगत्वा कमी पडणार नाही. पण, वाडीवस्तीतील कुणबाऊ शेतीपासून जागतिक दर्जाच्या शेतीपर्यंत हनुमानउडी घेताना काही साधनांचा त्याला मोठा उपयोग होणार आहे.


 १. देशातील सारी शेतीव्यवस्था सरकारी कायदेकानू, नियम, लालफीत आणि गलथानपणा यांनी ग्रासून गेली आहे. भारतीय शेतीतून सरकारची हकालपट्टी करून तिचे खाजगीकरण करणे हे सर्वात महत्त्वाचे पहिले साधन. शेतजमिनीची मालकी सरकारची, शेतकऱ्यांना ती फक्त कसण्याकरिता पट्ट्याने दिलेली. सरकारची मर्जी फिरेल त्याप्रमाणे कोणत्याही सार्वजनिक कामाचे

बळिचे राज्य येणार आहे / २१३