पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतीमालांच्या किमती हिंदुस्थानच्या बाजारपेठेपेक्षा अधिक होत्या. त्यामुळे, निर्यातीची मोठी शक्यता प्रत्यक्षात होती. निदान शिवाराच्या हद्दीवरतरी भारतीय शेतीमाल इतर देशांशी स्पर्धा करू शकत होता. बंदरावर पोहोचेपर्यंत, गचाळ संरचनाव्यवस्थेमुळे यातील बहुतेक फायदे संपून जात असत. तरीही, नैसर्गिक शेतीउत्पादने, औषधी व सुगंधी वनस्पती, संकरित वाणांचे प्रगुणन अशा काही क्षेत्रांत जागतिक बाजारपेठ काबीज करण्यास भारताला मोठा वाव होता.
 गेल्या दोनतीन वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. जगभरच्या अनेक देशांत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीची उत्पादकता वाढत आहे. परिणामतः, जगभर शेतीमालाच्या भावात मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे, अनेक शेतीमालांच्या किमती जागतिक बाजारपेठेच्या तुलनेने हिंदुस्थानातच वरचढ असल्याने निर्यातीत पडतळ पडण्याची शक्यता राहिलेली नाही.
 ६.
 शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी साऱ्या जगाची एकच एक बाजारपेठ बनणे, देश-देशांना एकमेकांपासून दूर ठेवणाऱ्या भिंती कोसळून पडणे ही मोठी ऐतिहासिक आवश्यकता आहे.
 अलीकडे ख्रिस्त सनाची २००० वर्षे पूर्ण झाली. यापुढे कदाचित, कालगणना बर्लिनची भिंत कोसळली त्या दिवसापासून केली जाईल. मनुष्यजातीचा इतिहास हा कुंपणे तोडण्याचा आणि भिंती उल्लंघून जाण्याचा आहे. माणसाची परस्परांशी संपर्क करण्याची साधने मर्यादित होती तोपर्यंत त्याचे सारे विश्वच मर्यादित होते. तोंडाने बोलायचे, कानांनी ऐकायचे एवढीच संचारव्यवस्था होती तोपर्यंत देवघेवीचे संबंध गावापुरतेच मर्यादित राहिले. प्रवासाला बैलगाडी मिळाली, घोडा ताब्यात आला तसतसे माणूस गावकुसाबाहेर पडला. तरीही आपापले राज्य, प्रदेश, भाषा यांच्या भिंती कायम राहिल्या. प्रत्येकाला आपल्या कुंपणाविषयी प्रखर अभिमानही वाटू लागला.
 चारशे वर्षांपूर्वी धर्म, भाषा आणि अर्थकारण यांच्या आधाराने राष्ट्र या संकल्पनेचा उगम झाला आणि आपल्या राष्ट्राच्या हद्दीतले ते आपले, ते सुष्ट आणि हद्दीबाहेरचे सारे दुष्ट असा एक कडवा राष्ट्राभिमान महान सद्गुण मानला जाऊ लागला.

 राष्ट्राभिमानाच्या अतिरेकातून साम्राज्यवाद फोफावला. महायुद्धे भडकली, अतोनात जीवित व वित्तहानी झाली तरी राष्ट्रीय अहंकार ही मोठी प्रखर भावना म्हणून शिल्लक राहिली.

बळिचे राज्य येणार आहे / २११