पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ही काही केवळ हिंदुस्थानातलीच स्थिती आहे असं नाही. तिसऱ्या जगातल्या सगळ्याच देशांची ही स्थिती आहे. आपण नेहमीच्या आपल्या शब्दात म्हणतो की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला. हीच स्थिती तिसऱ्या जगातील जवळजवळ सगळ्या देशांची आहे. स्वातंत्र मिळाले म्हणजे प्रत्येक देशातून कुठं गोरा इंग्रज , कुठं गोरा फ्रेंच,कुठं गोरा डच, कुठं काळा गोरा जर्मन, कुठं स्पॅनिश यांच्याऐवजी काळा इंग्रज, कुठं काळा फ्रेच कुठं काळा डच, कुठं काळा जर्मन, कुठं काळा स्पॅनिश आला आणि त्या त्या देशामध्ये जो काही व्यापारी, उद्योगधंदा करणारा एक समाज साम्राज्यवादाच्या काळामध्ये साम्राज्यवाद्यांनीच उभा केला होता त्यांच्याच हाती सत्ता आली. शोषित हा क्रांती करीत नाही, शोषक क्रमाक २ हाच क्रांती करतो आणि या सगळ्या साम्राज्यांमध्ये शोषक क्रमांक २ हा स्वातंत्र्यानंतर हाती सत्ता घेऊन पुढे आला. हिंदुस्थानात स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेताना गांधींना पुढे करण्यात आलं. कारण जर का ही चळवळ कारखानदारांची, व्यापाऱ्यांची झाली असती तर गांधींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या मागे जी काही कोट्यवधी माणसं उभी राहिली होती ती उभी राहिली नसती. पूर्वीच्या काळी किल्ल्याचे दरवाजे फोडायचे झाले तर त्याच्यावर हत्ती नेऊन धडक मारत असत आणि हत्ती घाबरायचा म्हणून मध्ये उंट उभा करायचा आणि हत्ती त्याला टक्कर मारायचा. या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये दरवाजा फोडण्याकरिता गांधीवादाचा उपयोग फक्त उंट म्हणून करण्यात आला. दादाभाई नौरोजी, रानडे किंवा गोखले बोलत होते शेतकऱ्यांविषयी; पण ज्या काही मागण्या ते करीत त्या मागण्या सगळ्या शहरातल्या नवीन व्यापारी वर्गाकरिता, नवीन कारखानदार वर्गाकरिता केलेल्या दिसून येतात. स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व जर काही दादाभाई, रानडे, गोखले यांच्या हाती राहिलं असतं आणि अशा जर मागण्या ठेवल्या असत्या तर त्याला सर्वसामान्य लाकांचा जो पाठिंबा मिळाला तो मिळणं शक्य नव्हतं. गांधींचा मुखवटा चळवळीनं घेतला, लोकांना वाटलं गांधीवाद जिंकला. प्रत्यक्षामध्ये नेहरूवाद्यांनी, कारखानदारांनी गांधीवादाला वापरून घेतलं. विचार गांधीवादाचा दाखवला; पण त्या चळवळीची खरी प्रेरणा ही गांधीवादाची नव्हती, ती नवीन कारखानदार, नवीन व्यापारीवर्गाचीच प्रेरणा होती.

 ४० वर्षांनंतर पाहिलं तर काय झालं? ४० वर्षांमध्ये या सगळ्या देशामध्ये काही समान गोष्टी आहेत. नियोजन करायचं म्हणजे काय ? नियोजन करायचं म्हणजे आपल्या देशातली जी साधनसंपत्ती असेल त्याचा वापर जास्तीत जास्त

बळिचे राज्य येणार आहे / १७