इमारती तर दुसऱ्या बाजूला, शेतीमध्ये जगणाऱ्या लोकांच्या झोपड्या ढासळताहेत. हजारो, लाखो लोकांची रांगच्या रांग शहरांकडे लागली आहे. ज्या कुणाचा तर्क जागा आहे तो सांगू शकेल की या दोघांमध्ये ज्या काही देवघेवीच्या अटी आहे त्या उघड उघड ग्रामीण भागाच्या विरुद्ध आहेत; पण या अर्थशास्त्रज्ञांनी खोटी आकडेवारी तयार केली. मी मुद्दाम 'खोटी' ह शब्द वापरतो. कारण व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांनी ज्या चुका करू नयेत, ज्या चुका केल्याबद्दल साध्या पदवीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्याला नापास करण्यात येईल असल्या चुका करून, प्रत्यक्षामध्ये देवघेवीच्या अटी या शेतकऱ्यांना बाजूने आहेत असे सांगणारे विद्वत्ताप्रचूर प्रबंध या अर्थशास्त्रज्ञांनी अनेक लिहिले. त्यात त्यांनी युक्त्याही तशाच प्रकारच्या वापरल्या. शेतकऱ्यांच्या देवघेवीच्या अटींचा ऊहापोह करताना, शेतकरी कोणत्या वस्तू विकत घेतो त्याची यादी आणि त्या यादीमधील वेगवेगळ्या वस्तूंचे प्रमाण काय आहे याच्याशी जरा जरी खेळ केला की आपल्याला पाहिजे ते सोयीस्कार निष्कर्ष काढता येतात. त्याचबरोबर, देवघेवीच्या अटी बिघडल्या का सुधारल्या हे पाहताना आधार म्हणून कोणतं वर्ष घ्यायचं? एखादं वर्ष असं असू शकतं की त्यावेळी शेतीची परिस्थिती फारच वाईट होते आणि ते जर पायाभूत वर्ष धरलं गेलं तर त्यांच्यानंतर शेतीमध्ये सुधारणाच झाली असं दिसून येतं. समाजवादी देशांनी धान्याच्या उत्पादनाने प्रत्यक्ष आकडे कधी दिले नाहीत. जी भाषा केली ती नेहमी टक्केवारीची केली. आधी एक पोतं धान्य तयार होत असलं आणि दुसऱ्या वर्षी ४ पोती तयार झाली तर ४०० टक्के धान्यात वाढ झाली; पण ४ पोत्यांनी काही देशांच पोट भरू शकत नाही. अशा टक्केवारीच्या खेळाचा अवलंब करून हिंदुस्थानमधल्या अर्थशास्त्रज्ञांनीसुद्धा शेतकऱ्यांना बनवलं.
आजपर्यत, १९९० सालापर्यंत अर्थशास्त्रज्ञांची हिंदुस्थानात जी काही अधिकृत फळी आहे ती जवळजवळ यच्चयावत् शेतकऱ्यांच्या विरुद्ध एका बाजूने घोषणा करणारी, दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांवर आरोप करणारी अशा तऱ्हेची प्रचंड फळी उभी आहे. म्हणजे तिसऱ्या जगात वादविवाद झाले नाहीत कारण शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला कोणी नाही. वादविवाद जो काही झाला तो गांधी - नेहरूंत होऊन गेला आणि गांधीना कधीच फेकून देण्यात आलं, नेहरूवादानं जिंकलं. आणि त्यानंतर जुनं सगळं गांधीवादाचं अर्थशास्त्र फेकून देऊन शहराची बाजू मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी एकतर्फी शेतकऱ्यांच्याविरुद्ध धोशाच चालवला आहे.